खारेपाटण /-
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण गावच्यानजीक असणाऱ्या वायंगणी गावचा सुपुत्र अजित अशोक गिडाळे याला जपान सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. जपान सरकार आणि जपान फाउंडेशनकडून दरवर्षी या स्कॉलरशिपसाठी परीक्षा घेतली जाते. यावर्षी देखील ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अजित गिडाळे याने चांगले यश संपादन करून तो या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाला. अजित गिडाळे हा जपानमधील नामांकित असणाऱ्या ‘नागोया ‘युनिव्हर्सिटीमध्ये आपले पुढील शिक्षण घेण्यासाठी ५ नोव्हेंबरला जपानमध्ये दाखल झाला आहे.
या युनिव्हर्सिटीमध्ये अजित ऍडव्हान्स जापनीज लँग्वेज आणि जापनीज कल्चर याचा रिसर्च आणि ट्रेनिंग स्टुडन्ट म्हणून दाखल होणार आहे. पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातुन अजित याने जापनीज भाषेची पदवी प्राप्त केली आहे. खारेपाटण-कणकवली महाविद्यालयातुन बी.ए. इंग्लिशची पदवी ही त्याने प्राप्त केली आहे. त्याचबरोबर जपान भाषेमधील अत्यंत महत्त्वाच्या दर्जाची JLPT म्हणजेच जपानी भाषा प्राविण्य परीक्षा-N2 लेव्हलदेखील अजित उत्तीर्ण झाला आहे. तसेच इंडो जापनीज असोसिएशन पुणेच्यावतीने भारतात ईस्ट-वेस्ट-साऊथ-नॉर्थ झोनमध्ये घेण्यात आलेल्या जापनीज भाषा वक्तृत्व स्पर्धेत अजितने वेस्ट झोनमधील स्पर्धेत सिनिअर गटातून दुसरा क्रमांक पटकावून दिल्ली येथे होणाऱ्या देशस्तरीय जपानी भाषा वक्तृत्व स्पर्धेत आपले स्थान पक्के केले होते. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
आता ऑक्टोबर २०२० मध्ये त्याला जपान सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली असून तो आपले पुढील शिक्षण जपानमधील ‘नागोया ‘युनिव्हर्सिटीमध्ये घेणार आहे.
अजित आपल्या या सर्व यशाचे श्रेय आपले आई-वडील, शिक्षक, व मार्गदर्शकांना दिले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील खारेपाटण येथील कर्मचारी अशोक गिडाळे यांचा अजित हा सुपुत्र असून अजितच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.