कुडाळ /-
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून शिवसेनेवर केलेल्या टिकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे जेव्हा आव्हान देतात त्यांनतर ते स्वतःच पळ काढतात.२०१९ च्या निवडणुकीतून राणेंनी असाच पळ काढला. परंतु २०२४ च्या निवडणूकित राणेंनी उभे राहून दाखवावे असे प्रतिआव्हान कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले आहे.
नारायण राणेंनी शिवसेना संपविण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्या पेक्षा दुप्पटिने वाढली आहे. शिवसेनेचा आता मुख्यमंत्री देखील आहे. राणेंनी दिलेले आव्हान शिवसेनेने २०१४ सालीच मोडून काढले, २०१४ मध्ये राणेंचा पराभव माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाने केला. त्याचबरोबर त्यांच्या मोठ्या मुलाचा देखील सलग २ वेळा शिवसेनेने दारुण पराभव केला. तसेच राणेंना माहितच असेलच गेल्या निवडणुकीत त्यांचा छोटा मुलगा पक्ष बदलून भाजपा मधून उभा राहिला नसता तर तोही पराभूत झाला असता. राणेंनी २०१९ च्या निवडणुकीतून पळ काढला परंतु २०२४ च्या निवडणुकीत राणेंनी उभे राहून दाखवावे असे आव्हान देत त्यावेळी तुम्हाला कळेल कोकणातून शिवसेनेचे ११ आमदार येतात की २१ आशा शब्दात आ. वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा समाचार घेतला.