सरकारने सूडबुद्धीने चालवलेला अन्याय थांबवावा, अन्यथा यातून होणाऱ्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार!!

सिंधुदुर्ग/-

सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालीयन यांचे गूढ मृत्यूप्रकरण असो, अथवा कंगना राणावतच्या घरावर द्वेषबुद्धीने फिरवलेला बुलडोझर असो, उद्धव ठाकरे सरकारला मागील कालावधीत सातत्याने हैराण करून सोडलेल्या रिपब्लिकन टीव्हीच्या पत्रकार अर्णव गोस्वामीला आज ठाकरे सरकारने कोणत्याही मानवाधिकाराचे पालन न करता अटक केली. मागील गुन्हे उकरून ही अटक दाखवण्यात आली आहे. याचे संतप्त पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही याविषयी जनतेतून नाराजी व्यक्त होत असतानाच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी जिल्हा पोलीस प्रमुख श्री राजेंद्र दाभाडे यांना “रिपब्लिक चॅनेलचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी नाहक अटक केल्याविषयी” निषेधात्मक निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते श्री अतुल काळसेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत, जिल्हा चिटणीस श्री बंड्या सावंत, आणि भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे उपस्थित होत्या. अर्णव गोस्वामी प्रकरणावरून सिंधुदुर्ग जिल्हातही राजकारण भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालच जिल्ह्यात झालेल्या भाजपाच्या कार्यकारीणीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपा नेते खासदार नारायणराव राणे यांनी राज्यातून आघाडी सरकारला व जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणार असल्याची आक्रमक घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यभरातच वातावरण पेटण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणावे लागेल.
आपल्या निवेदनात राजन तेली म्हणतात की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सदरचे सरकार जनतेशी सूड बुद्धीने वागत आहे. सरकार विरोधी कारनाम्यावर आवाज उठविणाऱ्या पत्रकार, नागरिक यांच्याविषयी सरकारचे वागणे अत्यंत द्वेषाचे आहे,याचा प्रत्यत्य आजच्या घटनेने राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला आला आहे.
आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी केलेली आत्महत्या ही त्यांच्या वैयक्तिक समस्येतून झालेली आहे.तरीही या घटनेत अर्णब गोस्वामी या पत्रकाराला नाहक गुंतवून सरकार आपल्या विरोधी व्यक्त होणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.
ही घटना भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी अशी आहे.
मी भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने या घटनेचा तीव्र निषेध करतो.सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा पूर्णपणे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पाठीशी असून सरकारने त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्वरित थांबवावा अन्यथा जिल्हाभर याविरोधात तीव्र निषेध आंदोलन उभारण्यात येईल,त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची आपण पोलीस प्रमुख या नात्याने नोंद घ्यावी.

दरम्यान राज्यभरात सरकार आणि विरोधक यांच्यात जोरदार जुंपली असून, इमर्जन्सी इन महाराष्ट्र अशी हॅशटॅग भाजपातर्फे सोशल मीडियावर जोरदार चालवली जात असून अनेक नेते ठाकरे सरकार विरोधात संतप्त ट्विट्स केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page