वेंगुर्ला /
आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर आहे. परंतु पंचायत समिती कडे दिलेला प्रस्ताव वेळेत जि.प.कडे पाठविण्यात वेळ लागल्यामुळे निधी परत गेला,याला जबाबदार कोण आहे याची चौकशी तात्काळ करुन त्यांचेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पं. स.सदस्य सुनिल मोरजकर यांनी पं.स.मासिक सभेत केली.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनुश्री कांबळी यांच्या अनुपस्थितीत उपसभापती सिध्देश परब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. या सभेत सदस्य सुनिल मोरजकर,यशवंत परब, स्मिता दामले, गौरवी मडवळ,प्रणाली बंगे,साक्षी कुबल, शामसुंदर पेडणेकर ,गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी सहभाग घेतला.
आसोली उपकेंद्र कडील नवीन खोलीचे व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले असून अतिवृष्टीमध्ये संरक्षक भिंत कोसळलेली आहे. सदरच्या बांधकामाचे अंदाजपत्रक किती होते,कोणी बांधले, निधी किती आला व त्यावर किती खर्च करण्यात आला त्याची सविस्तर माहिती त्वरीत देण्यात यावी,असे मोरजकर यांनी सुचीत केले.पेंडूर ग्राम पंचायती मधील ग्रामसेवकाने मासिक सभेत ठराव न घेता चुकीचा ठराव नोंद केला. त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.त्वरीत कारवाई करण्यात यावी, रेडी-रेवस सागरी महामार्गावर रेडी ते वेंगुर्ला पर्यंत खडडे पडलेले आहेत ते तात्काळ भरावेत, असे पं.स. सदस्य सुनिल मोरजकर यांनी सुचीत केले.अतिवृष्टीमुळे कोचरा,म्हापण,केळूस गावातील भाजीपाला-भातशेतीचे नुकसानीचे संयुक्तीक पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक अदयाप पर्यन्त आलेले नाहीत. त्यांचे पंचनामे त्वरीत करण्यात यावे, अशी सूचना सदस्य गौरवी मडवळ यांनी मांडली.
भोगवे गावाहून वेंगुर्ला तालुक्याच्या ठिकाणी प्रवाशांना येण्यासाठी वेंगुर्ला हून सकाळी ९.३० वा. तसेच संध्याकाळी ४ वाजता प्रवाशांना भोगवे येथे जाण्यासाठी अशा दोन एस.टी. बसच्या फेऱ्या सुरु करण्यात याव्यात ,अशी सुचना पं.स.सदस्य प्रणाली बंगे यांनी केली.वेंगुर्ले तालुक्यामध्ये कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर सदय:स्थितीत एस.टी. महामंडळाने प्रत्येक गावासाठी एसटीची एक फेरी सुरु करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या येण्यासाठी सोय केली, परंतु परत गावात जाण्यासाठी सोय नसल्यामुळे परिणामी भारमान कमी होत आहे. भारमान वाढविण्यासाठी प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक गावात येण्या-जाण्यासाठी एसटीच्या दोन फेऱ्या सुरु करण्यात याव्यात, असा ठराव सुनिल मोरजकर यांनी व त्यास सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सर्वसाधारण मासिक सभा केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे घेण्यात यावी असे शासनाचे पत्र आहे. परंतु वेंगुर्ला तालुक्याची भौगोलिक रचना पहाता खेडेगावामध्ये ग्रामपंचायतीस्तरावर व्यवस्थीत रित्या रेंज येत नसल्याने सभेत व्यवस्थिपणे विषय मांडता येत नाहीत, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभा घेण्यात याव्यात असे शासनास कळविणेत यावे असा ठराव
सुनिल मोरजकर यांनी मांडला व त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
आडेली भंडारवाडी-गोपीनाथ तलावाकडील विदयूत ट्रान्सफॉर्मर वाढीव क्षमतेचा बसविण्यात यावा, असा ठराव साक्षी कुबल यांनी मांडला व त्यास सर्वांनूमते मान्यता देण्यात आली.दिव्यांग कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील परिपत्रक अन्वये दिव्यांग व्यक्ती व सर्व नागरिकांना दिव्यांग व्यक्ती संदर्भातील सर्व कायदे व योजनांची माहिती सहज व सुलभ मिळणे संदर्भात जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती वेंगुर्ला मध्ये “सल्ला व मार्गदर्शन कक्ष” स्थापित करण्यात आलेला असून त्याबाबतची अमंलबजावणी करणेत येत आहे.सदर तालुका स्तरावरील पंचायत समितीमध्ये स्थापित केलेल्या “सल्ला व मार्गदर्शन कक्ष” च्या कामकाजावर गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे,उपसभापती सिध्देश परब यांनी ठराव मांडला.