वेंगुर्ला /-
लॉकडाऊनचा फायदा घेऊन अज्ञाताने योगेश जयराम तांडेल यांच्या खवणे भगतवाडी येथून बंद घरातून खिडकीची काच फोडून सुमारे ६० हजार रुपयांचे इमारतीचे साहित्य चोरीस गेले आहे.याबाबत योगेश तांडेल यांनी निवती पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना २६ मार्च २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घडली आहे.वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी हरीचरणगिरी येथील योगेश जयराम तांडेल यांनी पर्यटन व्यवसायाकरिता खवणे भगतवाडी येथील पुरुषोत्तम परब यांच्या मालकीच्या जमिनीत दगडी इमारत बांधकाम केले असून इमारतीचे इतर बांधकाम सुरू आहे.सदर निवासाकरिता लागणारे साहित्य त्या घरात ठेवले होते.दरम्यान आज ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तांडेल व त्यांची पत्नी तेथे गेले असता खिडकीची काच फुटलेली आढळून आली.कुलूप उघडून पाहिले असता सामान चोरून नेल्याचे आढळून आले.यामध्ये २७,५०० रुपये किमतीचे फरशीचे २५ बॉक्स,९२०० रुपये किमतीचे बाथरूम फरशीचे २६ बॉक्स,१० हजार रुपये किमतीच्या ५ ताडपत्र्या,३५०० रुपये किमतीची पाण्याची टाकी,५ हजार रुपये किमतीचे स्लायडिंग साहित्य,३ हजार रुपये किमतीचे कार्पेट,१ हजार रुपये किमतीचा एच.पी.कंपनीचा गॅस सिलिंडर आदी साहित्य अज्ञाताने चोरून नेले आहे,असे तांडेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत निवती पोलिस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शामराव कांबळी हे करीत आहेत.