मुंबई-/
काबूलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले.
काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला.
हल्लेखोर या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले असता त्याने स्फोट घडवला, असे अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी सांगितले.
अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसून, तालिबानने या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तानात गेली अनेक दशके सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी बोलणी सुरू केली असतानाच तालिबान व सुरक्षा दलांमधील हिंसाचारात वाढ झाली आहे.