जालना /-
दिल्लीतील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांचे वक्तव्य कुणालाही पटण्यासारखे नाही. उलट त्यांनी पक्ष सोडू नये अशीच भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती. परंतु या प्रयत्नास यश येऊ शकले नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसे यांनी भाजपमध्ये भवितव्य नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतीलच एका वरिष्ठ नेत्याने दिल्याचे सांगितले होते. या संदर्भात दानवे म्हणाले, की अशा प्रकारे खडसे यांना भाजपमधील कुणा नेत्याने सल्ला दिलेला नसेल हे आपण आतापर्यंतच्या राजकारणातील अनुभवावरून सांगू शकतो. खडसे यांनी आपल्या मनातील भावनांची जाहीर वाच्यता करण्याऐवजी पक्षनेतृत्वाकडे बोलावे अशी आमची इच्छा होती. माझ्या समक्ष त्यांनी अमित शहा, नड्डा यांची भेट घेतली. नितीन गडकरी, फडणवीस, मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आपण स्वत: त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी प्रयत्न केले. परंतु आमच्या प्रयत्नांना यश आले नाही.