११ तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न
मुंबई –
नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. गेल्या ११ तासाहून जास्त वेळ ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत, मात्र अद्याप ही आग आटोक्यात आली नाही. या आगीत अडकलेल्या ५०० पेक्षा जास्त लोकांची सुखरुप सटका करण्यात आली आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे २ कर्मचारी जखमी झाले आहेत.रात्रीच्या ९ च्या सुमारास सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये आग लागली.
मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईल शॉपीला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. काही क्षणातच ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. भयानक आग पाहता अग्निशमन दलाने ब्रिगेड कॉल घोषित केला. मागील ११ तासांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. २०० हून जास्त दुकानांना या आगीचा फटका बसला आहे, यात सर्वाधिक दुकाने मोबाईलची आहेत. आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या, ६ वॉटर टँकर, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. लेव्हल ५ ची आग असल्याने मुंबईतील सर्व अग्निशमन दलाच्या केंद्राकडून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. काही खासगी यंत्रणाही आग विझवण्यासाठी मदत करत आहेत. सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्याना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचे लक्षात आले.
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट देवून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली.सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या सुमारे ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३,५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.