मुंबई /-
करोना संकट अद्यापही पूर्पणणे टळलं नसल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे साजरा करणार की यावेळी उद्धव ठाकरे ऑनलाइन संवाद साधतील अशी चर्चा सुरु आहे. ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही अधांतरीच असल्याचं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं होतं. पण आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार असल्याचं त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना म्हटलं आहे.”उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल,” असं सांगताना संजय राऊत यांनी याबद्दल सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे.
“शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल असं कोणी सांगितलं?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमधील १२ सभा कशा होणार आहेत याचा अभ्यास करु,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. “दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा असून त्याचं सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. तसंच बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. सरकारने आखलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्या चर्चा सुरु असून एक दोन दिवसात निर्णय होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.