लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्रथम प्राधान्यक्रम.;उदय सामंत

लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्रथम प्राधान्यक्रम.;उदय सामंत

पालकमंत्री सामंत यांनी जनता दरबारमध्ये जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविल्या

सिंधुदुर्ग /-

लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्राधान्यक्रम असून आज शेकडो जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे, असे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, मी कायम लोकांमध्ये राहूनच कार्य करीत आलो आहे. नागरिकांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने कोरोनावार मात करून मी आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने मी जनता दरबारच्या माध्यमातून कामाला सुरूवात करतोय. या उपक्रमास नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग लाभत आहे. याचा मनस्वी आंनद आहे.

श्री.सामंत म्हणाले, आपल्या समस्या घेऊन ज्या नागरिकांना मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात येणे शक्य होत नाही, अशा सर्व नागरिकांसाठी जिल्ह्यामध्ये ‘जनता दरबार’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून असंख्य नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडविल्या जात आहेत. हा उपक्रम सुरू राहणार असून पुढच्या जनता दरबार मध्ये आज आलेल्या नागरिकांच्या समस्या किती प्रमाणात सोडविल्या गेल्या, याचा आढावा घेतला जाणार आहे.

ज्या नागरिकांनी आपल्या समस्या जनता दरबार मध्ये मांडल्या आहेत, त्यांच्या अडचणी सोडविल्या की कसे, याबाबत माहिती घेण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.

आज जिल्ह्यातील सर्व भागातून बहुसंख्य नागरिक या जनता दरबार मध्ये सहभागी झाले होते. यावेळी, शिवसैनिक, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, पालक, लोककला कलावंत, अधिकारी, जेष्ठ नागरिक, शेतकरी, दिव्यांग नागरिक व ग्रंथालय कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांनी त्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना संबंधित विभागास केल्या.

गेल्या अनेक वर्षापासून असा जनता दरबार झाला नसून आज पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यात येऊन आमच्या अडचणी तत्काळ सोडविल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. तसेच त्यांनी सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न समजून घेतले याबद्दल असंख्य नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

या जनता दरबारला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आणि सर्व विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..