सिंधुदुर्गनगरी /-
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा ICU उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करुन पाठवावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयय येथे आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोविड-19 चा जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, आरोग्य अधिकारी श्री. कांबळे, तहसिलदार अमोल पाठक आदी उपस्थित होते.
सध्याच्या कोविड काळातील आरोग्य यंत्रणा सुधारणासाठीच्या संधीत रुपांतर करावे, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्हृयातील सध्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्हीटी रेट हा 0.03 टक्के आहे. त्यामुळे लोकांनी भिती बाळगण्याचे कारण नाही. पण नागकरीकांनी अजूनही खबरदारी घेणे गरजेचे आहे. जे स्थानिक व्यापारी, नागरिक आणि स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू करणार आहेत. त्यांचे स्वागत आहे. त्याला प्रशासनाने सर्व सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन आता लॉकडाऊन करणार नाही, पण जनता कर्फ्यू करण्यास आमचे सहकार्य राहिल. जिल्ह्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अजून प्रयत्न करावेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा आता सुरु होत आहे. याला नागरिकांनी पहिल्या टप्प्याप्रमाणे सहकार्य करावे. सध्याची परिस्थिती पाहता आपण लवकरच शुन्यावर पोहचू असा विश्वासही पालकमंत्री श्री. सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, उपचार, रुग्णसंख्या पॉझिटीव्हीटी रेट, मृत्यूदर, खाजगी कोविड सेंटर, माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वांचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हृयातील आतापर्यंतच्या मृत्यूची कारणे व त्याचे विश्लेषण करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. या समितीमध्ये शासकीय अधिकारी, डॉक्टर्स यांसह खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. सध्या ही समिती कोविडमुळे झालेल्या मृत्युचे ऑडिट करत असल्याचेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले.