आचरा /-

आचरा देवस्थान जमिनीत बेकायदा हस्तांतरण झाल्याचे ठरवत शासनाकडून सातबारा वरील मालक कुळाची नावे हटवित जमिन देवस्थानच्या नावे करण्यात आलेल्या कारवाई विरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय आचरा ग्रामपंचायत येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. या साठी मुंबई ग्रामस्थ व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने न्यायालयीन लढा उभारण्याचे ठरविण्यात आले.तसेच आचरा गावात वाडी वाडीवर बैठका घेऊन लढा तिव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

देवस्थान जमिनीत बेकायदा हस्तांतरण बाबतीत तहसीलदार मालवण यांच्या कडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चेकलम २५७(१)वर्ग निरिक्षण प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्यानुसार आचरा देवस्थान जमिनीत बेकायदा हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्याने या वर निकाल देताना उपविभागीय अधिकारी कुडाळ यांनी महसूल पुर्ननिरिक्षण अर्ज मान्य करत बेकायदा हस्तांतरण झालेले फेरफार रद्द करुन जमिन पुर्ववत देवस्थानच्या नावे करण्याचा आदेश दिला होता.
या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार होती.मात्र कोरोना पार्श्र्वभूमीवर वाहतूक व न्यायालयीन कामकाज बंदी मुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली नाही. या कालावधीत महसूल प्रशासनाने कार्यवाही करत बेकायदा हस्तांतरण झाल्याचे ठरविलेल्या ९९प्रकरणातील सातबारा वरील मालक,कुळांची नावे रद्द करुन जमिन देवस्थानच्या नावे केली आहे. या मुळे बेदखल होण्याची भीती निर्माण झालेल्या संबंधित ग्रामस्थांनी सरपंच प्रणया टेमकर आणि या बाबतीत निर्णय घेण्यासाठी बनविलेल्या समितीचे अध्यक्ष अनिल करंजे यांच्या उपस्थितीत आचरा ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी सायंकाळी बैठक घेत शासनाच्या निर्णया विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर, माजी सरपंच राजन गांवकर, शेखर मोर्वेकर,अभय भोसले, जगदीश पांगे,चंदन पांगे,हरीश्चंद्र पेंडूरकर, जयप्रकाश परूळेकर, विद्यानंद परब,प्रल्हाद चिंदरकर, महेश गांवकर यांसह ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना शेखर मोर्वेकर यांनी सांगितले बेकायदा हस्तांतरण दाखवत आमच्या जमिनी काढून घेणारे देवस्थान संबंधित लोक स्वत: मात्र बेकायदा जमिनी विकत आहेत. आज गावाशी नाळ नसलेले लोक ट्रस्टी बनले आहेत आणि हेच लोकांना वेठीस धरत आहेत.त्यामुळे या साठी न्यायालयात दाद मागण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्टची नियमावली असताना मनमानी पणे गावातीललोकांना सभासद करून घेत नाहीत .माजी सरपंच गावचा नागरीक असतानाही यांनी आपणास सभासदत्व नाकारले असल्याचे राजन गांवकर यांनी सांगितले.यावेळी बोलताना अनिल करंजे यांनी सांगितले की वारंवार देवस्थान समितीशी पत्रव्यवहार करूनही आमच्या सोबत बैठक घेण्यासाठी प्रतिसाद दिला नाही.आचरेगावातील वर्ग तीन जमिनी मुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही आहे.विकासकामे होत नाही आहेत. तरीही देवस्थान समितीची या बाबतीत नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आठ दिवसांत गावसमितीची बैठक घेण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले . देवस्थान समितीशी चर्चा करण्यासाठी अभय भोसले, अनिल करंजे, जगदीश पांगे, अर्जुन बापर्डेकर यांची नावे ठरविण्यात आली.

यावेळी मुंबई स्थित ग्रामस्थ आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लढा तिव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला . या साठी मुंबई ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करुन लढा तिव्र करण्यासाठी पंधराजणांची समिती स्थापन करण्यात आली.यात सरपंच प्रणया टेमकर, गाव समिती प्रमुख अनिल करंजे,जेराॅन फर्नांडिस, मंगेश टेमकर,राजन गांवकर, विनायक परब चंदन पांगे, जयप्रकाश परूळेकर, शेखर मोर्वेकर, अभय भोसले, जगदीश पांगे, पांडूरंग वायंगणकर, राजेंद्र परब,प्रल्हाद चिंदरकर आदींची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page