मसुरे /-
मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र आणि मुंबई महानगर पालिकेतील सांताक्रुज पूर्व येथील वार्ड क्रमांक ८८ चे शिवसेना नगरसेवक सदानंद परब यांची सलग दुसऱ्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समिती अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड करण्यात आली आहे.यासाठी विशेष सहकार्य
श्री.अनिल परब (परिवहन मंत्री),सौ.किशोरीताई पेडणेकर(महापौर, मुंबई),
श्री.यशवंत जाधव (स्थायी समिती अध्यक्ष),सौ.विशाखाताई राऊत(सभागृह नेत्या) यांचे लाभले.
पालिकेच्या वैज्ञानिक समितीच्या दरवर्षी होणार्या निवडणुका या वर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे रखडल्या होत्या. मात्र राज्य सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सदानंद परब मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा या गावचे रहिवासी असून मसुरे गावच्या सर्व विकासात्मक प्रश्नांबाबत तसेच कला क्रीडा सामाजिक धार्मिक या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे. तळागाळातील जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून सदानंद परब यांचे सांताक्रुज पूर्व येथे सर्व क्षेत्रात मोठे काम आणि योगदान आहे त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे गावात मोठे कौतुक होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदानंद परब यांचे अभिनंदन केले आहे.