रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी संबंधित महिलेस केली परत..
वेंगुर्ला /-
रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर मासेविक्री महिलेकडे सुपूर्द करीत वेंगुर्ला येथील सुमोचालक जेम्स डिसोजा यांनी प्रामाणिकपणा दाखविला.
शनिवारी वेंगुर्ला-दाभोली नाका परिसरात असलेल्या सुमो स्टॅण्डच्यासमोर सुमो व्यावसायीक जेम्स डिसोजा यांना पिशवी पडलेली दिसली.
पिशवीमध्ये ८ हजार रुपये, बॅगेच्या चाव्या यासह मासेविक्रीसाठी दिलेला बिल्ला होता. मात्र, त्यात ओळख पटण्यासारखा कोणता पुरावा नसल्याने व्हॉटसअॅप व फेसबुक या सोशल मिडियावर पैशाची पिशवी सापडल्याचे प्रसिद्ध केले. परंतु, तरीही कोणी पैशाची पिशवी नेण्यास आले नाही. पिशवीत सापडलेल्या मासेविक्रीच्या बिल्ल्यानुसार मासेविक्री करणाऱ्या महिलांना याबाबत विचारणा केली असता सदरची पिशवी ही उभादांडा केपादेवी मंदिर नजिक राहणाऱ्या महानंदा सज्जन गिरप यांची असल्याची आढळून आले. त्यानुसार महानंदा गिरप यांनी आज सुमो स्टॅण्डवर ही पिशवी आपलीच असल्याची खातरजमा केली. त्यानंतर जेम्स डिसोजा यांनी ती पिशवी गिरप यांच्या स्वाधीन केली. आपली रक्कम जशीच्या तशी मिळाल्याने महानंदा गिरप यांनी जेम्स डिसोजा यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यावेळी संजय भाटकर, गिरगोल फर्नांडीस, चंद्रशेखर तोरसकर, अमित म्हापणकर, सुशिल बांदेकर आदी सुमो व्यावसायीक उपस्थित होते.