मालवण /-
जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने यावर्षीच्या आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारांची घोषणा केली असून यात नऊ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील अभ्यासू व कार्यकुशल ग्रामसेवक म्हणून ओळख निर्माण करणारे देवबाग ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक युवराज चव्हाण यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यास व समस्या सोडविण्यास सर्वतोपरी मदत करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने आदर्श ग्रामसेवक, ग्रामसेवक अधिकारी पुरस्कारासाठी जिल्ह्यातील नऊ जणांची निवड केली. यात देवबाग गावचे ग्रामसेवक युवराज चव्हाण यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. युवराज चव्हाण यांनी डिसेंबर २००५ मध्ये चौके ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून आपल्या कामास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची वायरी भूतनाथ ग्रामपंचायती मध्ये बदली झाली होती. वायरी भूतनाथ गावचा कारभार हाकताना युवराज चव्हाण यांनी गावात पर्यटन विकासाच्या दृष्टीने गावात ठिकठिकाणी बेंचेस, पर्यटकांसाठी माहिती व सूचना फलक लावले. तर वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मध्ये ग्रामपंचायतीच्या नावाची कमान तसेच किल्ल्यात बेंचेस व प्रसाधन गृहांची व्यवस्था केली. त्यानंतर आता देवबाग ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना देवबागच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक अभिनव व स्तुत्य उपक्रम चव्हाण यांनी देवबागमध्ये राबविले. गावात ठिकठिकाणी बेंचेस, वाहनांसाठी वळणाच्या रस्त्यावर आरसे, वॉटरकुलर, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, राज्यात ग्रामपंचायतीची पहिली रुग्णवाहिका, शीतशवपेटी, ओपन जिम आदी विविध उपक्रम चव्हाण यांनी राबविले. सध्या ते देवबाग बरोबरच मिर्याबांदा ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळत आहेत.
युवराज चव्हाण यांनी ग्रामसेवक संघटनेतही काम करताना ग्रामसेवकांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाजही उठविला. २०१० ते २०१४ या कालावधीत त्यांनी मालवण तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तर जिल्हा संघटनेत कार्याध्यक्ष म्हणूनही काम केले. आपल्या अभिनव उपक्रमांनी व उत्तम प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.