मुंबई /-
सरलेल्या आठवड्यात अनलॉक-5 अंतर्गत तरतुदीत जाहीर केल्यानंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सरलेल्या आठवड्यात 3.49 टक्क्यांनी म्हणजे 1308 अंकांनी वाढला.आगामी आठवड्यात मात्र निर्देशांकासमोर अनेक अनिश्चित बाबी आहेत. पहिली बाब म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाचा संसर्ग होऊन रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रम्प यांच्या प्रकृतीकडे जगातील वृत्त माध्यमांचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यांची प्रकृती बिघडली असली तरी अमेरिकन सरकारने लवकरच नवे पॅकेज जाहीर करण्याचे जाहीर केले आहे. या दोन बाबीवर जागतिक शेअर बाजाराच्या निर्देशांकांची दिशा ठरेल.
त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतात.
या आठवड्यापासून कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होण्यास सुरूवात होणार आहे. सात नोव्हेंबरला भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार असलेली कंपनी टीसीएस आपला ताळेबंद जाहीर करणार आहे. या ताळेबंदाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. कारण इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्याच्या ताळेबंदाचा अंदाज टीसीएसच्या ताळेबंदावरून गुंतवणूकदारांना येऊ शकतो.
व्याजमाफीकडे गुंतवणूदारांचे डोळे
सोमवारी करदात्यांना चक्रवाढव्याज माफ करायचे का याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याअगोदर ही सुनावणी बऱ्याच वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता केंद्र सरकारने दोन कोटी रुपयापर्यंतचे कर्ज घेतलेल्यांना चक्रवाढव्याज न लावण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि यातून काय तोडगा निघतो यावरही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. कारण या निर्णयाचा नागरिक, उद्योगांबरोबरच बॅंकांशी संबंध आहे.