▪️नोंदीत बांधकाम कामगारांची कार्यालयाकडून पिळवणुक होत असल्याचा संघटनेचा आरोप..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळाकडून विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मात्र कामगारांना प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असून कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे अश्या तक्रारी कामगारांकडून प्राप्त झाल्याआहेत. या संदर्भात वारंवार कामगार कार्यालयाकडे व मंडळाच्या सुविधा केंद्राकडे कामगारांच्या व्यथा मांडून देखील त्यात तिळमात्र बदल झालेला दिसून येत नसून दिवसेंदिवस कामगारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी व प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवार दि. २२ मे २०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात लक्षवेधी ठिय्या आंदोलन स्वाभिमानी कामगार संघटनेकडून पुकारण्यात आल्याचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या संदर्भात संघटनेने सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मंडळाकडील शैक्षणिक सहाय्य,आरोग्य विषयक,आर्थिक सहाय्य,सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचे प्रस्ताव महिनोंमहिने तपासले जात नाहीत व परिणामी कामगारांचे लाभ प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत, मंडळाच्या सुविधा केंद्राकडून लाभाच्या प्रस्तावांमध्ये चुकीच्या व मनमानी पद्धतीने त्रृटी काढल्या जात असून अर्जांची वेळीच तपासणी होत नाही, कामगारांना कार्यालयात सततचे हेलपाटे मारावे लागत असून कामगारांचे लाभाचे प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नामंजूर केले जात आहेत, सुविधा केंद्र स्तरावर लाभ प्रस्तावातील त्रृटीची कामगारांनी अनेकवेळा पूर्तता करून देखील प्रस्ताव त्रृटी दाखवून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, कामगारांच्या नोंदणी / नुतनीकरण विषयक ऑनलाईन अर्जांमध्ये चुकीच्या व मनमानी पद्धतीने तारखांबाबत त्रृटी दाखवून अर्ज नामंजूर केले जात असून त्यामुळे कामगारांना नाहक आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत जेवण सुविधा पुरविणे उपक्रमात अनेक अनियमितता असून पुरविले जाणारे खाद्य पदार्थांबाबत कामगारांच्या तक्रारी व मध्यान्ह भोजन वितरण योजनेतील त्रुटींबाबत पुरवठादार संस्थेवर नियंत्रण ठेवणे,मध्यान्ह भोजन योजनेपासून वंचित कामगारांना लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून व वितरण व्यवस्थेतील त्रृटी दूर कराव्यात अशा मागण्या संघटनेने निवेदनातून कामगार अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या आहेत. कामगारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा होवून कामगारांचा मनस्ताप कमी व्हावासंघेनेने व शिष्यवृत्ती लाभाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर होवून दिलासा मिळावा यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page