▪️ओंकार कलामंचचे आयोजन; परी डान्स क्रिएशन द्वितीय, तर यंगस्टार तृतीय…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

ओंकार कलामंचच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सागर डान्स ग्रुप मालवण हा संघ विजेता ठरला. तर परी डान्स क्रिएशन कुडाळ हा उपविजेता, यंगस्टार मालवण या ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी बेस्ट डान्सर म्हणून लहान गटातून सान्वी मोरजकर तर मोठ्या गटातून प्रणिता बर्डे हिला गौरविण्यात आले. तर चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ व एम. जे. डान्स अकॅडमी सावंतवाडी हे दोन्ही संघ उत्तेजनार्थ बक्षीसाचे मानकरी ठरले.

येथील ओंकार कलामंचच्या डान्स अकॅडमीच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ नाटय कलाकार कल्पना बांदेकर, माजगावचे माजी सरपंच आबा सावंत, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेबकर, कोरिओग्राफर अनिकेत आसोलकर, गणेश भालचिम, मंदार काळे आदी उपस्थित होते

यावेळी श्री. दळवी म्हणाले, सावंतवाडी शहराने गेले अनेक वर्ष सांस्कृतिक कला परंपरा जपली आहे. अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून तेथील ओंकार कलामंचने ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक उपक्रमास यापुढेही आमच्या शुभेच्छा राहतील.

यावेळी श्री. राऊळ म्हणाले, या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले पाहिजेत. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून घेण्यात आलेला राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा निश्चितच नवोदित कलाकारांना प्रेरणा देणारी ठरेल. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश निंबळेकर यांनी केले. तर आभार आसोलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page