कुडाळ /-
आंबेडकर पुतळा ते एस टी डेपो रस्त्याचे काम १ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.हे माहित असताना त्या ठिकाणी दोन दिवस अगोदर वृक्षारोपण करायची नौटंकी करण्यापेक्षा जे रस्ते मुळातच मंजूर नाहीत किंवा या रस्त्यांसाठी राज्य शासनाकडे निधी नाही त्या रस्त्यांचा आधी पाठपुरावा करावा आणि मगच नगरपंचायतीच्या रस्त्याकडे लक्ष घालावे. असा समाचार कुडाळ नगरपंचायत नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अनंत उर्फ प्रवीण धडाम यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
कुडाळ आंबेडकर पुतळा ते एसटी डेपो पर्यंतचे काम हे १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे असे कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी अगोदरच जाहीर केले आहे. परंतु प्रसिद्धी करता व स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता संजय भोगटे यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण करणार असे जाहीर केले आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेपासून,शहरातील प्रत्येक वाडीतले रस्ते हे नव्याने करण्यात आले आहेत. कुडाळ गांधी चौक ते एसटी डेपो हा एकमेव रस्ता अद्यापपर्यंत झालेला नसून त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे.
त्याचप्रमाणे कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुका या पुढील वर्षी होत आहेत आणि त्यामुळेच आपले अस्तित्व दाखवण्याकरिता व आमदारांच्या मागे लोटांगण घालुनही अजुनही मिळत नसलेले आयते स्विकृत नगरसेवक मिळवण्यासाठी संजय भोगटे यांनी फुकटचा,खटाटोप करू नये कुडाळ शहरात जनता आपल्याला चांगलीच ओळखून आहे असं देखील धडाम यांनी म्हटलं आहे.
संजय भोगटे यांनी कुडाळ शहरात फिरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यावर देखील अशाच प्रकारचे आंदोलन करावे. कुडाळ पोलिस स्टेशन ते आर एस एन हॉटेल तसेच कुडाळ पोस्ट ऑफिस ते नाबरवाडी मार्गे दत्तनगर येथील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली आहे. त्याकडे संजय भोगटे हे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत. त्याकरता संजय भोगटे यांनी पुढाकार घ्यावा व तेथेही वृक्षारोपण करावे. यासाठी लागणारी झाडे आम्ही पुरवू असे आबा धडाम यांनी भोगटे यांचा समाचार घेतला आहे.