सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे काम करताना श्रेय घेण्यासाठी नाही तर कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. जिल्ह्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा नगर परिषद निहाय आढावा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या ऑनलाईन बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी सहभागी झाले होते.
कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये नगर परिषद व नगर पंचायतींना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, मास्कचा वापर, स्वच्छता आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपणास जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करावयाचा आहे. सध्या जगात कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे या त्रिसुत्रीचा वापर आपण करावयाचा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व कुटुंबातील प्रत्येक सदस्यास दोन मास्क व सॅनिटायझर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. लवकरच जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.

सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील ग्रमिण भागासह शहरी भागातही नागरिकांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक नगर परिषदेला 10 पल्स ऑक्सिमिटर, 10 थर्मल गन व लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पीपीई कीट पुरविण्यात येतील. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षिय अभिनिवेश बाजूला ठेऊन सक्रियपणे सहभागी व्हावे. पुढील दोन महिने आपल्या सर्वांना कोविड जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी एकत्र काम करावयाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करावे असे पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी सर्व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा सविस्तर आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page