वेंगुर्ला /-
वेंगुर्ला शहराचा भाग विस्तारित असून तालुक्यातील शासकिय सर्व आस्थापने ही शहरात असल्याने वेंगुर्ला शहरास कायमस्वरूपी पोलीस पाटील पदाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी सावंतवाडीचे उपविभागीय (महसुल) अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,वेंगुर्ला शहर विभागात गेल्या सुमारे दोन-तीन वर्षापासून पोलिस पाटील पद रिक्त आहे. वेंगुर्ला शहर विभागाचा पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार हा उभादांडा गावच्या पोलीस पाटील यांचेकडे देण्यात आला आहे.
वेंगुर्ला शहरातील कॅम्प-वडखोल, वडखोल कणकेवाडी, कोनी-भटवाडी, भटवाडी-किनळणे अशा भागापासून ते उभादांडा-वरचेमाडवाडी येथे उभादांडा पोलीस पाटील यांचे घर सुमारे ७ ते ८ किमी अंतरावर आहे. सर्वसामान्य नागरीकांना व विद्यार्थी वर्गाला आवश्यक दाखल्यांच्या कामासाठी मोठी पायपीट करावी लागते व नाहक त्रास सोसावा लागतो.त्यामुळे वेंगुर्ला शहरासाठी येथील शहरातील नागारकांची अडचण होणार नाही यादृष्टीने स्वतंत्र पोलीस पाटील “शहरातच” कायम उपलब्ध व्हावा.तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये,म्हणून वेंगुर्ला शहर विभागातील गेली २ ते ३ वर्षे करीत असलेली पोलिस पाटील पद तात्काळ भरावे.वेंगुर्ले शहरवासियांना निर्माण झालेली समस्या त्वरीत दूर करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.