कोव्हिड रुग्णांसाठी मनसेची “ऑनलाईन कोव्हिड शब्दांकन” स्पर्धा..

कोव्हिड रुग्णांसाठी मनसेची “ऑनलाईन कोव्हिड शब्दांकन” स्पर्धा..

मालवण /-

सिंधुदुर्गातील कोव्हिड रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून आलेले चांगले- वाईट अनुभव, रुग्णालयात कोव्हिडने मृत्यू झाल्यावर निर्माण झालेली परिस्थिती आणि शासन – लोकप्रतिनिधीं बाबतचे मत प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने मनसेच्या वतीने सिंधुदुर्गात कोव्हिड रुग्णांसाठी “ऑनलाईन कोव्हिड शब्दांकन” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मनसे जिल्हा सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर व विल्सन गिरकर यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हयातील कोरोना रूग्णांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अयोग्य पद्धतीने कामकाज सुरू आहे. रॅपिड अ‍ॅटिजन टेस्टबाबत विश्‍वासार्हता नसताना या टेस्टवर भर दिला जात असून त्यामधून पॉझिटीव्हची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालये तसेच तालुकानिहाय कोविड सेंटरकडे होणारे दुर्लक्ष, तेथील रुग्णांची होणारी गैरसोय, खरेदीतील घोटाळा, चढ्या दराच्या निविदा तसेच उपसंचालक पातळीवर नर्सेसच्या बदल्यांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्यावतीने आंदोलने करण्यात आली होती. नुकतेच मनसेच्यावतीने जनता मदत केंद्र ओरोस येथे जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर सुरू करण्यात आले आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे
आता मनसे रुग्णांना आलेले अनुभव एका अनोख्या स्पर्धेद्वारे विचारणार आहेत. माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतुन ही ऑनलाइन कोव्हिड शब्दांकन स्पर्धा सोमवार दि. २८ सप्टेंबर ते शनिवार १० ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत घरापासून रुग्णालयापर्यंत व रुग्णालयापासून घरापर्यंत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आलेले चांगले-वाईट अनुभव, रुग्णालयात दाखल असताना आलेले चांगले-वाईट अनुभव, रुग्णालयात मिळणारी व्यवस्था, डॉक्टर सेवा, जेवण, नाश्ता, पाण्याची उपलब्धता, रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा कोव्हिडने मृत्यु झाल्यानंतर होणारी परिस्थिती, शासन व लोकप्रतिनिधींबद्दल आपले असलेले मत याबाबत
शब्दांकन ८०० ते १००० शब्दांत करायचे आहे. तरी या स्पर्धेत सहभाग घेवू इच्छिणाऱ्यानी sindhudurgmnsmedia@gmail.com किंवा ९४२३३०२४२२ या व्हाट्सअप क्रमांकावर आपले नाव, पत्ता संपर्क क्रमांक व शब्दरुपी माहिती पाठवायची आहे. स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकांना २०००/-, १०००/- व ५००/- तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कोव्हिड रुग्णांनी सहभाग घेऊन त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना आलेले अनुभव शब्दांमध्ये मांडून सहभागी व्हावे असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर व विल्सन गिरकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..