कणकवली /-

गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या व माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊनही काहीच कार्यवाही न झालेला कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण प्रश्न चर्चेत असताना गुरुवारी अचानक धक्कातंत्राने नगरपंचायतने सुचवलेल्या जागेवर नवीन पुतळा बसवण्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. कणकवली नगरपंचायतने ज्या ठिकाणी 500 चौरस मीटर जागा पुतळ्याच्या स्थलांतरणासाठी सुचवली होती, त्या जागेतच हा पुतळा बसविण्यात आला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे पुतळ्याच्या स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून रंगलेले राजकारण आता थांबण्याची शक्यता आहे. मात्र जुना पुतळा जाग्यावर जैसे थे स्थितीत आहे. भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी या पुतळ्याच्या स्थलांतरणाकरिता उपोषण छेडल्यानंतर त्यावेळी काही • दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांनी देखील या कळ्याच्या ठिकाणी पाहणी करत जर हा पुतळा रातोरात स्थलांतरित केला गेला तर, त्याला प्रशासनाने आम्हाला जबाबदार धरू नये.

तसेच एका रात्री काय घडेल त्याची जबाबदारी आजपासून आमची नाही असा इशाराही दिला होता. गेली तीन वर्षाहून अधिक काळ हा पुतळा धोकादायक स्थितीत कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत सर्विस रस्त्याच्या मध्यभागी होता. या पुतळ्याच्या दोन्ही बाजूने सर्विस रस्ते गेल्याने ह्या पुतळ्याच्या ठिकाणी अपघात होण्याची ही भीती होती. त्यातच शिवराज्याभिषेक दिनीच या पुतळ्यालगद दोन अपघात देखील झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता हा पुतळा स्थलांतरित करण्याची गरज होती. आणी तीन वर्षे त्याच्या मागण्या देखील होत होत्या. अखेर गेल्या अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज हा नवीन पुतळा दीपनाईक यांच्या फॅब्रिकेशन दुकानासमोरील जागेत बसविण्यात आल्याने जुन्या पुतळ्याच्या स्थलांतरणा च्या मुद्द्यावरून निर्माण झालेले राजकारण आता परत पेटण्याची शक्यता आहे. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून हा पुतळा योग्य जागी स्थलांतरित व्हावा याकरिता माजी पालकमंत्र्यांसह सर्वपक्षीय बैठक नगरपंचायत मध्ये आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी पालकमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, यांच्यासह कणकवलीतील बहुतांशी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी उदय सामंत यांनी महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या 20 गुंठे जागेपैकी 8 गुंठे जागेमध्ये पुतळा स्थलांतरित करत या ठिकाणी भव्य स्मारक करण्याचे सूतोवाच केले होते. याकरिता पीडीसी मधून आवश्यक असेल तेवढा निधी देण्याचे नी मान्य केले होते. त्यानंतर या शासकीय जागेतील अतिक्रमणांची मोजमापे घेत पंचयादी करून जमीनीची मोजणी करण्यात आली.

तसेच या शासकीय जागेत असलेल्या सर्व दुकानांची मोजमापेही घेण्यात आली व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. मात्र उदय सामंत यांनी तीन महिन्याचा वेळ दिल्यानंतर त्यापुढे काहीच झाले नव्हते. या पुतळ्याचे स्थलांतरण जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयास जवळील जागेत करावे व तेथील छत्रपतींचे भव्य स्मारक करावे अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली होती. मात्र याबाबतचा प्रस्ताव पाठवला गेला नव्हता. एकूणच या संपूर्ण स्थलांतरण प्रक्रिये करिता मागण्या व आदेश होऊनही प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होत नव्हती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी अचानक सकाळी छत्रपतींचा पुतळा नव्याने बसवल्याचे पाहून मात्र गेली काही वर्षे चर्चेत असलेला मुद्दा मात्र गनिमी काव्याचा वापर करत मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या पुतळ्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात ठेवण्यात आला आहे. मात्र हा पुतळा कुणी बसवला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page