You are currently viewing शिवसेनेच्या पोटात गोळा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आदित्यसह केवळ १९ आमदार.

शिवसेनेच्या पोटात गोळा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आदित्यसह केवळ १९ आमदार.

मुंबई /-

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला असून शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३५ आमदारांना सोबत घेवून बंड पुकारले आहे.

काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथील ‘ली मेरेडियन’ हे हॉटेल गाठले आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय गोटात सध्या मोठी खळबळ उडाली असून ठाकरे सरकार संकटात सापडले आहे.या संकटातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कामाला लागले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ‘वर्षा’ बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे केवळ १८ आमदारच उपस्थित होते.याशिवाय शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपले बंधू अर्जून आबिटकर यांना पाठवून देत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह सध्या १९ आमदार असल्याचे समोर येत आहे.

कोणते आमदार होते बैठकीत उपस्थित?

आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह बैठकीला आमदार वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, संजय राठोड, प्रकाश फातरपेकर, राहुल पाटील, सुनिल प्रभू, दिलीप लांडे, उदय सामंत, राजन साळवी, योगेश कदम, सदा सरवणकर, अजय चौधरी, प्रकाश आबिटकर उपस्थित होते.या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सुरतच्या ‘ली मेरेडियन’ या हॉटेलमध्ये ते स्वतः आणि जवळपास ३५ आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल आहेत, मात्र त्यांनीही आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आहे. या सर्व आमदारांनी शिवसेना सोडल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याची शक्यताही धुसर आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर सध्या संकट गडद झाले आहे.

अभिप्राय द्या..