You are currently viewing बांधकाम कामगारांची होते पिळवणूक,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण,जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, सचिव रवींद्र साळकर यांनी वाचला अन्यायाचा पाढा.शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा.

बांधकाम कामगारांची होते पिळवणूक,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण,जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, सचिव रवींद्र साळकर यांनी वाचला अन्यायाचा पाढा.शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा.

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप कामगार कल्याणकारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर तसेच सचिव रवींद्र साळकर यांनी केला आहे. कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम कामगारांची कशी पिळवणूक होते याचा पाढा वाचला. याबाबत शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, सचिव रवींद्र साळकर, खजिनदार प्रदीप तांबे, कोशाध्यक्ष ओंकार खांडेकर, संघटक भारत पेंडुरकर, मंगेश चव्हाण, सदस्य मंदार पाटकर गणेश नांदोसकर उपस्थित होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कामगार मंडळाला कायमस्वरूपी कामगार अधिकारी नाही. जे अधिकारी म्हणून नेमणूक आहे त्यांच्याजवळ तब्बल चार ठिकाणचा चार्ज आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पनवेल अशा जिल्ह्यांचा कारभार एक अधिकारी यांच्या हातात असल्याने कामगार वर्गात प्रचंड नाराजी आहे. कामगारांची कामे खोळंबुन पडलेली आहेत. तीन ते चार महिन्यातून एक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळतो यासाठी शासनाने यावर त्वरित लक्ष द्यावा. कामगार अधिकारी चार जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळेल याचेही उत्तरही शासनाने द्यावे.
कामगार मंडळातून बांधकाम कामगार यांना एकूण एकोणीस योजना आहेत परंतु त्यातील सर्व योजनांचे लाभ अजूनही कामगारांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. कोविड काळातील शिष्यवृत्ती कोणत्याच विद्यार्थ्यांना मिळालेली नाही, आता तर कामगारांना पत्र पाठवून त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचे काम कामगार मंडळ मुंबई कडून केले जात आहे. मंडळाने पत्र पाठवून सर्व डॉक्युमेंट पुन्हा तपासणी करण्यासाठी बोलविले जात आहे. ओरिजनल कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरते वेळी अपलोड केले असतानाही आज त्यांना कागदपत्रे तपासणी करून हेलपाटे मारण्यास सांगितले जात आहे. तसेच शासन परिपत्रक नुसार 60 हजार च्या वर असलेल्या कामगार वर्गाचे कागदपत्रे तपासणी करावी असे असतानाही सरसकट सर्व शिष्यवृत्ती चे कागदपत्रे तपासणी साठी बोलविले जात आहे.
आजची परिस्थिती ही covid-19 नंतर सुधारते परंतु या परिस्थितीवर मात करून कामगार कष्ट करायला व कामाला जायला लागला. आज त्याच कामगाराने 2500 रुपयांसाठी आपल्या रोजंदारी वर पाणी सोडून कामगार कार्यालयात अर्ज करण्यासाठी, कागदपत्रे तपासण्यासाठी हेलपाटे मारावे का असा सवाल चव्हाण यांनी केला. त्याच बरोबर कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची अजून एक नवीन अजब योजना कामगारांनी 51 ते 60 या वयात मृत्यू झाल्यास दोन लाखाचा लाभ मिळणार. 18 ते 50 या वयात मृत्यू झाल्यास कोणत्याही बाबतीत त्यांना लाभ दिला जात नाही मग 18 ते 50 कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगारांनी काय करावे? असा सवाल शासनाला मंडळाला चव्हाण यांनी विचारला आहे.
मृत्यू क्लेम, शिष्यवृत्ती, पूर्णपणे पेंडीग आहे या योजनेचा लाभ जर कामगारांना मिळत नसेल तर कष्टकरी कामगार काही दिवसात रस्त्यावर उतरून कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार आहे. तसेच ऑनलाईन योजना चालू झाल्यापासून तांत्रिक बिघाड होत असल्याने कामगार वर्गाला योजने साठी मुकावे लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या विकसनशील आहे. त्यामुळे तेथे कामगारांची नोंदणी मोठया प्रमाणात होत आहे परंतु मंडळाकडून त्या नोंदणीला कुठेतरी खिळ घालण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे निर्बंध घातले जातात कामगार मंडळातून नोंदणी साठी कोणत्याही प्रकारचा उपक्रम व जनजागृती देखील केली जात नाही.
कामगारांना सुरक्षा संच वाटप केला जातो त्यामध्ये दिल्या जाणारे काही वस्तू या दुय्यम प्रकारच्या असून त्यांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे. तर सिंधुदुर्ग, सांगली ठिकाणी विविध योजना कार्यान्वित आहेत परंतु कोणत्याही योजना कार्यवाही होताना दिसत नाहीत. मध्यान्ह भोजन योजना कोल्हापूर सारख्या ठिकाणी कार्यान्वित आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. घरेलू कामगार यांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही नोंदणी देखील ठप्प करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरू आहे.
शासन निर्णय 29 जून 2018 सर्व बांधकाम कामगार यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी शासन निर्णय आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे उपक्रम राबविले जात नाही. जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी कामगारांच्या हितासाठी आम्ही झटत असतो यासाठी आमच्या संघटना मार्फत कामगार मंत्री हसनजी मुश्रीफ, खासदार विनायकजी राऊत, पालकमंत्री उदयजी सामंत, आमदार वैभवजी नाईक यांच्या जवळ अनेकदा पाठपुरावा केला परंतु कामगारांना हवा तसा न्याय अजूनही शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे आतातरी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नांदोसकर यांनी केली आहे.
सचिव रवींद्र साळकर यांनी बांधकाम कामगार हा आलिशान घर बांधतो परंतु त्याच आलिशान घरातील किंवा कार्यालयातील अधिकारी हे कामगारांची थट्टा करतात त्याची आज सर्व बाजूने पिळवणूक चालू केली आहे, ही कुठेतरी थांबवावी असे साळकर यांनी सांगितले.
आपल्या संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाठपुरावा करण्यात आला परंतु कामगार मंडळ मुंबई यांच्याकडून कामगारांची पिळवणूक अशीच होत राहिल्यास कष्टकरी कामगार वर्ग येत्या काही दिवसात रस्त्यावर सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहे असे श्री चव्हाण, नांदोसकर व सचिव साळकर यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..