You are currently viewing तीन तालुक्याच्या मानगुटीवर बसलेला टोल नाका ओसरगाव मधून हलवा.;राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची मागणी,

तीन तालुक्याच्या मानगुटीवर बसलेला टोल नाका ओसरगाव मधून हलवा.;राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची मागणी,

सिंधुदुर्ग / –

कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांच्या मानगुटीवर बसलेला टोल नाका ओसरगाव मधून हलवा अशी मागणी करत, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष अजय जाधव, कणकवली विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, गौरेश पारकर, इरफान शेख, प्रशांत बोभाटे आदी उपस्थित होते.

दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या टोल संदर्भात भूमिका मांडणार असल्याचे देखील पिळणकर यांनी सांगितले. हा टोल बंद होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले.

अनंत पिळणकर पुढे म्हणालेत की, ओरोस येथे जिल्ह्यातील महत्वाची शासकीय कार्यालय आहेत. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा रुग्णालय अशा शासकीय कार्यालयांमध्ये देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्यातील लोकांना सातत्याने ये-जा करावी लागते. त्यामुळे या वाहनधारकांनी रोजच टोल भरायचा का ? असा प्रश्न करत पिळणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाहीत अशी भूमिका देखील मांडली आहे. फक्त mh07 या वाहनांनाच टोलमाफी नको तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य नंबरची देखील वाहने आहेत त्यांनाहि टोल माफी मिळाली पाहिजे अशी भूमिका पिळणकर यांनी मांडली आहे.

ओसरगाव येथील टोल नाक्या मुळे जास्त त्रास हा कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागणार आहे त्यामुळे हा टोल नाका जिल्ह्याच्या वेशीवर नेऊन बसवावा असे देखील पिळणकर म्हणाले.

महामार्गाची कामे अद्यापही अर्धवट आहेत बऱ्याच ठिकाणी सर्विस रस्त्याची कामे झालेले नाहीत, तर काही ठिकाणी महामार्गाचे निवाडे पूर्ण झाले नाहीत. लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण टोल चालू करू देणार नाही असेही त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..