पत्रकाराला विनाकारण गुन्ह्यात गोवले जाते, तर घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुभा का?

सर्व राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनेच्या पाठपुराव्याला पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष..

महाराष्ट्र सरकार सह जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे निवेदन सादर..

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक आणि सहाय्यक निरिक्षक यांनी बेवारस दारुसाठ्यात घोटाळा करुन सरकारी मुद्देमालाची चोरी केल्याची धक्कादायक घटना प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रथमच समोर येऊन संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रभर खळबळ माजली आहे. यासंदर्भात पाठपुरावा करून देखील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून गेल्या पाच महिन्यात दोन्ही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान एका पत्रकाराला विनाकारण नाहक गुन्ह्यात गोवले जाते, तर घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल होत नाही, असा सवाल उपस्थित करत आक्रमक भूमिका घेऊन पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिले असुन त्या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यापैकी “आपला “ईमेल” मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी गृह विभाग यांना पाठविण्यात आला आहे.” असा सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हाधिकारी, पालकमंत्री, यांना देऊन त्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांना ई-मेल द्वारे पाठवली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ आबा खवणेकर, जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी, सदस्य मिलिंद धुरी, गुरुनाथ राऊळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक या दोन अधिकाऱ्यांनी दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेलच्या बाजुला श्रीकांत सरमळकर यांच्या प्रॉपर्टी मध्ये सापडलेला सुमारे २५ हजार रुपयांचा बेवारस दारूसाठ्याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई न करता आपापसात वाटून घेऊन स्टेशन डायरीत फक्त ५२६० रु.नोंद करुन घोटाळा केल्याचे प्रसिद्धीच्या माध्यमातून उघडकीस आणले होते आणि त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा देखील करण्यात आला होता. यामध्ये माजी आमदार परशुराम उपरकर व कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी संघटनेचे कार्यकर्ते यांचा समावेश होता. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र सदर घटनेला पाच महिने होऊन गेले तरी अद्याप दोषींवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.

वास्तविक तीन गोणीमध्ये सुमारे ३०० बॉटल मिळालेले असताना फक्त ३० बॉटल दाखवून सरकारचा बाकी मुद्देमाल स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतला आणि सरकारच्या मुद्देमालात फसवणूक केली. म्हणून त्यांच्यावर सरकारी मुद्देमालाची चोरी केल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु गेला एक महिनाभर चौकशीच्या नावाखाली या भ्रष्ट घोटाळेबाज अधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अभय दिल्यासारखे जनतेला वाटू लागले आहे. त्यांना पोलिस प्रशासन पाठीशी घालून वाचवत असल्याबद्दल जनतेला आता समजलेले आहे.

तसेच, सावंतवाडीतील पत्रकार विनायक गांवस हे बातमी कव्हर करण्यासाठी घटनेच्या ठिकाणी फिल्डवर काम करण्यासाठी जातात आणि इतर लोकांसोबत पोलिस ठाण्यामार्फत विनाकारण त्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला जातो. जर फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करत असाल तर सरकारी मुद्देमालात फसवणूक केल्याबाबत त्या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे. अन्यथा दि. २० मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल. पण त्यावेळी त्या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page