कुडाळ /-

कुडाळ शहरातील बाजारपेठेतील मारुती मंदिरात मनसेच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त ३ मेला महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:३० वा. या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दरम्यान याबाबत जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज कुडाळ पोलिसांना निवेदन दिले.

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदीवरील भोंगे उतरविण्यास संदर्भात केलेल्या विधानाला समर्थन दर्शविण्यासाठी हा अनोखा उपक्रम घेतला जात आहे.यावेळी प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, शहराध्यक्ष सिध्देश कुटाळे, रमाकांत नाईक, हेमंत जाधव, जगन्नाथ गावडे, महेश रावले, प्रथमेश धुरी आदी उपस्थित होते.

या बाबत अधिक माहीती देताना श्री. परब म्हणाले की गुढीपाडव्याच्या मनसेच्या जाहीर मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईदपर्यंत महाराष्ट्रातील मशिदीवरून भोंगे उतरवले जावेत, अशी भूमिका मांडलेली आहे.मशिदीवरील भोंगे उतरवणे हा विषय कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा असूच शकत नाही.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याचे जीवन शांततापूर्वक जगण्याचा घटनात्मक अधिकार दिलेला आहे. सुप्रिम कोर्टानेही या विषयावर शिक्कामोर्तब करत प्रार्थनास्थळावरील भोंगे उतरवण्याचा आदेश दिला आहे.ही भारतीय नागरिकांच्या शांततामय आयुष्य जगण्याच्या अधिकाराची लढाई असून कोणताही धर्म त्याच्या आड येऊ नये, गुढीपाडव्याच्या जाहीर मेळाव्यात आणि त्यानंतरच्या उत्तरसभेत श्री. ठाकरे यांनी आपली हीच भूमिका स्पष्ट शब्दात व्यक्त केली असताना त्यावरून राजकारण केले जाणे दुर्दैवी आहे, मनसे कोणत्याही धर्मा विरोधात नाही अथवा प्रार्थनेच्या विरोधात नाही, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी सामान्य जनतेच्या भावनांचा आदर हा करावाच लागेल. भोंग्यावरून केलेलीच प्रार्थना आपल्या श्रद्धास्थानापर्यंत पोहोचते असे कुठे आहे का? वृद्ध, आजारी रुग्ण, झोपेची गरज असलेले रात्रपाळीवरून आलेले कामगार, लहान मुले यांची झोप उडवून त्यांना मानसिक आणि शारीरिक पीडा देत केलेली प्रार्थना देवाला कशी मान्य होईल, हा प्रश्न एकदा विचारात घ्यावा व त्यानुसार भोंगे उतरवण्याचा निर्णय संबधीतानी घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर ३ मे ला महाआरती आयोजित केली असून प्रत्येकाने स्वतःहुन उत्स्फूर्त पणे या मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे. तर ३ तारिख नंतर या विषयी मार्ग न निघाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page