कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार..

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार..

रत्नागिरी /-

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत.

त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय खात्यातील आर्थिक उलाढालीलाही चाप लागणार आहे.आतापर्यंतची नोंदणीकृत मासेमारी नौकांची संख्या २८ हजार ७६८ एवढी आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत १५ हजार ६१२ एवढ्याच नौकांनी मासेमारी करण्यासाठी परवाने घेतले आहेत. मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नौका व प्रत्यक्षात मासेमारी परवाने घेतलेल्या नौकांमध्ये खूप मोठी तफावत आहे.अशा नोंदणीकृत पण परवाना न घेतलेल्या नौकांपैकीच काही नौका बेकायदेशीर मासेमारी करतात. त्याची मत्स्य व्यवसाय खात्याने गंभीर दखल घेतली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या नौकांनी मासेमारी परवाना घेतला नसेल, अशा सर्व नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत.
ठाणे-पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना तत्काळ याबाबत अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..