You are currently viewing वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी.

वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी हा रस्ता वाहतुकीस चांगला आहे.परंतु या मुख्य मार्गावर खड्डे पडले असून यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष पुरवावे,अशी मागणी होत आहे.दरम्यान काही वाहनधारक 'खड्डे चुकवून मार्ग काढण्याच्या नादात' जलदगतीने जात असल्याने अन्य वाहनधारकांना धोका निर्माण होत आहे.याबाबत संबंधित विभागाला खड्डे बुजविण्याचे कधी आदेश देण्यात येणार ? असा सवाल वाहनधारकातून उपस्थित केला जात आहे.वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे.या रस्त्यावर मठ बोवलेकरवाडी वळणावर, मठ टाकयेवाडी वळणावर,आडेली,आडेली जांभरमळा वळणावर, आडेली कामळेविर वळणावर व अन्य भागांत, तसेच कामळेविर बाजारपेठ,नेमळे तिठा ते आकेरी आदींसह मुख्य रस्त्यावर व मुख्यतः वळणावर खड्डे पडले असून वाहनधारकांना

बरेच छोटे अपघात होत आहेत.वाहनधारकांना आरोग्यासाठी तसेच वाहनांच्या दुरुस्तीसाठी अनावश्यक भुर्दंड पडत आहे.कामळेविर भागातील खड्ड्यांची स्थिती पाहता
वेंगुर्लेत, सावंतवाडीत तसेच मुख्यतः गोव्यात हायवेने कामानिमित्त जाणाऱ्या व उशिरा घरी परतणाऱ्या युवकांना या खड्ड्यांमुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे.दुचाकीधारक, रिक्षा व अन्य वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे सर्वसामान्य मणक्याच्या आजारांनी त्रस्त आहेत.मुख्य मार्ग असूनही व मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असूनही हे खड्डे बुजविण्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी,अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची ‘वस्तुस्थितीची’ त्वरित पाहणी करुन खड्डे बुजविण्यात यावेत,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.तसेच मागील महिन्यात शहरातील बऱ्याच ठिकाणी खड्डे बुजविण्यात आलेले आहेत.परंतु वेंगुर्ले भटवाडी मुख्य रस्त्यावर बहुतांशी वळणांवर अशीच खड्डेमय स्थिती असून हे खड्डे का बुजविण्यात आले नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शहरातील त्या कार्यक्षेत्रातील संबंधित विभागाने लक्ष पुरवावे,अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..