सावंतवाडी /-
मळगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामनिधी तसेच १४ वित्त आयोगाच्या निधीतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मळगाव नूतन ग्राम सचिवालयाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थ तसेच शिवसेनेच्या काही ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
मळगाव ग्रामसचिवालयाचे उद्घाटन १ मे ला करण्यात येणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तसे वृत्त आज प्रसिद्ध झाले. याला ग्रामस्थांचा विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यानी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, अलीकडेच ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारा संबंधी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. यावेळी १४ वित्त आयोग तसेच ग्राम निधीतील भ्रष्टाचार त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या समोर उघड केला होता. त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन या संदर्भात लक्ष वेधले होते. मंत्री मुश्रीफ यांनी आयुक्त पातळीवरून या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. एकूणच या सर्व प्रकाराची चौकशी होत नाही तोपर्यंत मळगाव ग्रामसचिवालय नवीन इमारतीचे उद्घाटन करू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थ मनोहर राऊळ, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, आना गावकर, रत्नमाला तळकटकर तसेच तुकाराम सावंत, विनायक सावंत, काका गावकर, दीपक देवळी आदींनी दिला आहे.