You are currently viewing कासार्डे तांबळवाडीत श्री आवळेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न..

कासार्डे तांबळवाडीत श्री आवळेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न..

कणकवली /-

कासार्डे तांबळवाडी येथे श्री आवळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा झाला आहे.कासार्डे तांबळवाडी प्राथमिक शाळा ते श्री आवळेश्वर मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वाडीतील महिलांनी डोक्यावर कलश घेऊन ‘हर!हर! महादेवचा जयघोष व ढोलताशांच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यात कलशासाठी आकर्षक सजावट केलेला रथ व विविध वेषभुषा केलेले युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवतांना आवाहन, पुण्याहवाचन, वास्तूहोम, अभिषेक, कलशारोहन व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.मोठ्या भक्तिभावाने महाआरती संपन्न झाली.यानंतर याठिकाणी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री गांगेश्वर नवतरुण मित्र मंडळ, कुणकवण यांच्या ढोल पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.त्यानंतर महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. या मंदीर परिसरात छोट्या मुलांसाठी मोफत लावण्यात आलेल्या जंम्स सर्कल व खेळण्याचे साहित्य छोट्या मुलांसाठी पर्वणी ठरले.माहेरवासनी व स्थानिक महिलांचा फुगड्यांचा कार्यक्रम पार पडला.दरम्यान मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवर, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी बुवा विजय श्रीधर पाताडे व बुवा रविंद्र उर्फ बाळा पाटील यांच्या सूस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला.

अभिप्राय द्या..