नवी दिल्ली /-
सध्या देशभरात शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मध्यप्रदेशात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेत २ टप्प्यात ४ हजार रुपये दिले जातील. पीएम सन्मान निधीच्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही शून्य व्याजदरावरील कर्ज योजना पुन्हा सुरू केली आहे. किसान सन्मान निधी आणि विमा योजनेचा पूर्ण लाभ दिला आहे. धान्य खरेदीतून २७ हजार कोटींपेक्षा जास्त निधीचा लाभ शेतकऱ्यांना पोहोचवला आहे.