बांदा /-
मडुरा दशक्रोशीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. परबवाडी, भुताचाटेंब तसेच मळ्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने नुकसानीची पहाणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मुसळधार पावसामुळे भातशेती पाण्यात आडवी झाल्याने अगोदरच कोरोनाने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मडुरा दशक्रोशीत मोठ्याप्रमाणात भातशेती उत्पादन घेण्यात येते. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत अविरत सुरूच राहिल्याने भातशेती व बागायतींवर मोठा परिणाम झाला आहे. मडुरा, पाडलोस, रोणापाल, निगुडे, न्हावेली, कास, सातोसे व शेर्ले गावातील उभी पिके काही ठिकाणी आडवी झाली आहेत. मडुऱ्यात शेतकरी ज्ञानेश परब, प्रकाश मणेरकर, सोमनाथ परब, बाबली परब आदींसह बऱ्याच शेतकऱ्यांची कापणीयोग्य झालेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. परिपक्व झालेले भाताचे लोंब कुजण्याची भिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने तात्काळ भातशेती नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी, मडुरा सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानेश परब यांनी केली आहे.