१५ जानेवारी पूर्वी १२ किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचे आश्व|सन

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी कुडाळ- मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्यासाठी आज २७ डिसेंबर रोजी आंदोलन छेडले अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी १५ जानेवारी पूर्वी १२ किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कुडाळ, वेंगुर्ले नागरिकांच्या एकजुटीचा विजय असो….. कोण म्हणतोय देणार नाही….. घेतल्याशिवाय जाणार नाही….. रस्ता नाही कुणाच्या बापाचा रस्ता आमच्या हक्काचा….. अशा घोषणा देत आज सकाळपासून दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर गोवेरी येथे या आंदोलनाला प्रारंभ झाला. कुडाळ- मठ मार्गे वेंगुर्ले कडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे आणि या रस्त्यावर अनेक अपघात होऊन काही जण जखमी झाले तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळेच आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी या मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना एकत्र करून कुडाळ ते वेंगुर्ले रस्त्यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला नागरिकांकडून प्रतिसाद लाभला. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नव्हते तर नागरिकांनी नागरिकांसाठी केलेले हे आंदोलन होते. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, वाडीवरवडे सरपंच अमेय धुरी, वेतोरे पालकरवाडी सरपंच संदीप चिचकर, वेतोरे वरचावाडा सरपंच राधिका गावडे, आडेली सरपंच प्राजक्ता मुंडये, खानोली सरपंच सौ खानोलकर तसेच वेंगुर्ला नगरपालिकेचे माजी नगरसेवक वामन कांबळे, भाजपचे पदाधिकारी राजू राऊळ, अजय आकेरकर, पिंगुळी माजी सरपंच राजन पांचाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, दीपक गावडे, भूषण तेजम, दादा चव्हाण, डॉ. आजगांवकर, रमाकांत नाईक, केदार सामंत, बाबल गावडे, प्रकाश मयेकर, मुस्ताक शेख, यतीन कदम आदीसह नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

कुडाळ ते वेंगुर्ले जाणाऱ्या रस्त्यावर जनआंदोलन सुरू झाले मात्र या आंदोलनाकडे नेहमीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी अनामिका जाधव यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांच्याविरोधात जन आक्रोश तयार झाला सकाळी ९ वाजता हे आंदोलन सुरू झाले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनामिका जाधव या दुपारी ११.३० वाजता घटनास्थळी दाखल झाल्या त्यानंतर आंदोलनकर्त्या नागरिकांनी त्यांना धारेवर धरले.तुमच्या एकाही शब्दावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे रत्नागिरीच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांना बोलवा. अन्यथा त्यांनी लेखी आश्वासन दिले तरच हे आंदोलन मागे घेतले जाईल असे सांगितले. या आंदोलनावेळी नागरिक रस्त्यावर उतरले होते. यामुळे वाहतूक कोंडी ही झाली होती. यावेळी  अनेकांनी आपल्या सत्तप्त भावना व्यक्त केल्या. रस्त्याच्या या परिस्थितीमुळे ज्यांचे जीव गेले आहेत ते जीव सार्वजनिक बांधकाम विभाग भरून देणार आहे का? अनेकांच्या पत्नी विधवा झाल्या त्यांच्या घरातील कर्ते पुरुष अपघातात मृत्यू झाले त्यांची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? आम्ही कर भरायचे आणि तुम्ही वातानुकूलित कार्यालयात बसून पगार घ्यायचे आमच्या करावर तुमचे पगार आणि विकास कामे होत असतात, मग आमची रस्त्यांची मागणी का पुर्ण होऊ शकत नाही असे अनेक सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केले. त्यानंतर आधार फाउंडेशन चे सचिव नंदन वेंगुर्लेकर हे अधीक्षक अभियंता छाया नाही यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना आंदोलनाबाबत ची माहिती दिली. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही आणि तशा प्रकारचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी १५ जानेवारीपूर्वी कुडाळ ते वेंगुर्ला जाणारा १२ किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे जनआंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फाटा तैनात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page