कणकवली /-
दशावतार कलाकारांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत नक्कीच शासनाचे लक्ष वेधले जातील, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतार कलाकारांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्या वतीने श्री. राणे यांची भेट घेऊन दशावतारात कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या समोर मांडण्यात आल्या. यावेळी श्री. राणे यांनी त्यांना हा शब्द दिला.
यावेळी श्री. राणे यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर आवाज उठवून सरकारकडून दशावतार कलाकारांच्या सर्व मागण्या सोडवून देण्यासाठी आश्वासन दिले. याप्रसंगी श्री. राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित दशावतारी जेष्ठ कलाकार यशवंत तेंडोलकर आणि राधाकृष्ण (बाबली काका) नाईक यांचा, त्याचप्रमाणे दशावतारी कलाकारांच्या वतीने श्री. राणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर, लक्ष्मण नांदोस्कर, यशवंत तेंडुलकर, रामकृष्ण नाईक, चारुदत्त तेंडुलकर, विलास परब, मिलिंद नाईक, भगवान कांबळी, दत्तप्रसाद शेणाई, कृष्णा परब, गोविंद लाड, गोरेश पांचाळ आदी कलाकार उपस्थित होते.