बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा पुरस्कार.

सावंतवाडी /-

ठाणे – डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविताना आमदार निलेश लंके, डॉ तात्याराव लहाने, अदिती तटकरे एकनाथ शिंदे, बच्चू कडू, नितीन बानगुडे पाटील दीपाली सय्यद आदी मान्यवर
ठाणे प्रतिनिधी
सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने गेले दोन वर्ष कोविड १९ प्रतिबंध उपाययोजनासह आजपर्यंत समाजहितासाठी विविध उपक्रम राबविले. या सर्वोत्कृष्ट कार्याची शिवसेनेच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष व ठाणे येथील डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनने दखल घेत आपल्या ४ थ्या वर्धापन दिन सोहळ्यात या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविण कुमार ठाकरे यांना
राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील निवडक अशा संस्थाना गौरविण्यात आले. यात तळ कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या कोरोना काळातील सर्वसमावेशक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांची राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
रविवारी ठाणे येथील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार निलेश लंके, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, शिवसेना उपनेते नितिन बानगुडे पाटील, अभिनेत्री दिपाली सैयद,
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, तसेच कल्याण – डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई या महापालिकांचे महापौर, उपमहापौर, आयुक्त, अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने दुर्गम अशा सरमळे शितपवाडीत आणि ओटवणेत आरोग्य शिबिर घेउन रुग्णांना गावातच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. सावंतवाडी शहरात भाजी दुकानांसमोर सुरक्षित शारीरिक अंतरासाठी पांढरे चौकोन आखून दिले. तसेच कोरोनाच्या प्रारंभीच
महिला बचत गटांकडून
दुपदरी कापडी मास्क शिवून घेउन ते वीज मंडळ, राज्य राखीव पोलीस दल, पेट्रोल पंप कर्मचाऱ्याना व पोलीसांना यांना वितरण केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही प्रतिष्ठानच्यावतीने मदत करण्यात आली. नाभिक बांधवांच्या व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील १६० नाभीक बांधव, चर्मकार बांधव व टू व्हीलर मेकॅनिक यांना कोरोना सुरक्षा किट आणि कोविड -१९ संबंधी नियमावलीचे स्टिकर्स देण्यात आले. कोरोना महामारीत समाजमन ताण-तणाव, नैराश्य, भीती, असुरक्षितता अशा समस्यांनी ग्रस्त होऊ नये म्हणून ‘ताण तणाव कारणे व उपाय’ या कार्यशाळेचे आयोजन केले. जिल्ह्यातील सुमारे ६० गावात कोविड बाबत जनजागृती निर्माण करणारे फलक लावले. कोरोनाबाधित परंतु गृहाविलागीकरणात असणाऱ्या कुटुंबियांना त्यांच्या गरजेनुसार औषधे, भाजी, किराणा, दूध व इतर आवश्यक साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घरपोच केले. तसेच तौक्ते चक्रीवादळ आणि पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page