You are currently viewing राजापुरातील अपघातात कुडाळमधील तरुण ठार, पत्नी जखमी..

राजापुरातील अपघातात कुडाळमधील तरुण ठार, पत्नी जखमी..

राजापूर /-

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर शहरातील वरचीपेठ पुलावर एका मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत कुडाळ येथील दुचाकीस्वार ठार झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. भगवान बाबुराव चव्हाण (26, कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग) असे मयत तरूणाचे नाव असून त्याची पत्नी राणी भगवान चव्हाण (22) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ येथील भगवान चव्हाण हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून देवरूख (जिल्हा रत्नागिरी) येथे सासरवाडीला जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरील वरचीपेठ पुलावर त्यांची दुचाकी आली असता मागून येणाऱया मालवाहून ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी ट्रकच्या पुढच्या भागात अडकून पुढे फरफटत गेली. भगवान आणि राणी दोघेही दुचाकी आणि ट्रकमध्ये अडकडून पडले.

या अपघाताची खबर मिळताच वरचीपेठ येथील ग्रामस्थ तसेच महामार्गावरून पवास करणाऱया पवाशांनी थांबून ट्रकच्या खाली दुचाकीमध्ये अडकलेल्या भगवान व राणी यांना बाहेर काढले. त्यानंतर लगतच असलेल्या दामोदर गाडगीळ यांच्या रूग्णवाहीकेतून त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच भगवान चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी राणी या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

अभिप्राय द्या..