कणकवली /-

ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी नेते अबिद नाईक उपस्थित होते. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची बबली राणे, सुदर्शन नाईक यांनी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ओसरगाव तलाव सुशोभीकरण करून ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करावे यासाठी अबीद नाईक यांच्या माध्यमातून निवेदन दिले. ओसरगाव तलाव हे नॅशनल हायवेलगत आहे.1973 साली ओसरगाव येथील शेतकऱ्यांनी अगदी कवडीमोलाने या तलावासाठी आपल्या जमिनी दिल्या. निसर्गसंपन्न असलेल्या ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी आजपर्यंत शासनस्तरावर काहीच हालचाल झाली नाही.गतवर्षी बबली राणे यांनी 3 दिवस प्राणांतिक उपोषण छेडल्यानंतर 60 लाख रुपये निधी खर्चून ग्रामदैवत लिंगमाऊली देवी मंदिराकडे जाणारा आणि अर्ध्या गावातील वाड्याना जोडणारा ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला आहे. अजूनही ओसरगाव तलाव सुशोभीकरण करण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पाऊले उचलणे गरजेचे आहे.

ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी तलावातील गाळ काढणे, तलावातील पाण्याचे होणारे लिकेज काढणे, पर्यटकांना तलाव परिसरात सोयीसुविधा निर्माण करणे, संपूर्ण तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक बनवणे, सेल्फी पॉईंट बनवणे, उद्यान बनवून उपहारगृह बोटिंग सुविधा उपलब्ध करणे, तलावालगत च्या टेकडीवरून तलावाच्या पाण्यावरून जाणारी झिप लाईन करणे, योगा सेंटर, हायमास्ट, लेझर कारंजे उभारणे, ओसरगाव ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण संरक्षक भिंत बांधून पक्का रस्ता तयार करणे आदी मागण्यांचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले आहे.या मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येईल असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page