You are currently viewing घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला.;विरण बाजारपेठेतील घटना..

घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला.;विरण बाजारपेठेतील घटना..

मालवण /-

मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ येथील विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात सोमवारी मध्यरात्री बाजुच्या जंगलातुन आलेल्या बिबट्याने घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करत कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट्याच्या या संचारामुळे विरण बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे. विरण बाजारपेठेच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलमय आहे. विरण बाजारपेठेत रस्त्यालगतच विजय बेलवलकर यांचे घर आहे. काल सोमवारी मध्यरात्री बाजूच्या जंगलमय भागातून आलेल्या बिबट्याने बेलवलकर यांच्या घराच्या परिसरात समोरील बाजुतुन प्रवेश करत घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरलेल्या कुत्र्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिबट्या व कुत्र्यात झटापट झाली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यापुढे कुत्र्याचा प्रतिकार कमी पडल्याने अखेर कुत्र्याला जीव गमवावा लागला. कुत्र्याला मारून तो बिबट्या बाजुच्या जंगलात निघुन गेला. मध्यरात्री घडलेला हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. बेलवलकर यांचे घर रस्त्यालगत असून त्यांच्या येथे भाडोत्रीही राहत असून त्यांची लहान मुले असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे या दोन्ही कुटूंबाना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. विरण बाजारपेठ परिसरातील जंगलमय भागातील बिबट्याचे अस्तित्व व त्यांचा विरण बाजारपेठेतील लोकवस्तीत रात्रीच्या वेळी होणारा संचार यामुळे विरण बाजारपेठ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन अधिकारी यांनी तात्काळ यांची दखल घ्यावी व पिंजरा आणुन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

अभिप्राय द्या..