वेंगुर्ला /-


भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावी लोके यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जि.का.का.सदस्य बाळा सावंत,कार्यालय मंत्री समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी व मुलींचा जननदर वाढण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजना सुरू केली,जी योजना संपूर्ण देशवासियांना आपलीशी वाटली.ही योजना केवळ सरकारी योजना न राहता या योजनेची व्याप्ती वाढली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीने हे अभियान तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम हाती घेतलेले आहे.याकरिता प्रत्येक जिल्ह्यात या अभियानासाठी पक्ष स्तरावर स्वतंत्र व्यवस्था उभी केली जात असून जिल्हास्तरावर १५ जणांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
या समितीच्या माध्यमातून गावागावात या विषयाची जनजागृती केली जाणार आहे.या समितीमध्ये डाॅक्टर,वकील,सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच महीलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी महिला शक्तीला एकत्र करून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या धोरणामुळे राज्यात महीलांवरील अत्याचारांच्या घटनांना ऊत आलेला आहे.गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याने महिलांवर अत्याचार करणारे मोकाट फिरत आहेत.महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे अंमलात येऊ शकला नाही. राज्यातील आघाडी सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत कमालीचे असंवेदनशील असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.सदा सर्वकाळ घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्यसरकारने कृती आराखडा जाहीर केला पाहिजे व यासाठी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या अभियानाचा उपयोग करणार असल्याचे अभियान जिल्हा संयोजक सावी लोके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page