You are currently viewing एक्साइजच्या भरारी पथकावर पेडणेत हल्ला दोन कर्मचारी जखमी..

एक्साइजच्या भरारी पथकावर पेडणेत हल्ला दोन कर्मचारी जखमी..

बांदा /-

खासगी वाहनातून विशेष मोहिमेवर आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकावर पेडणे सरंबळ येथे काही ग्रामस्थांकडून हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. यात उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पैकी एका कर्मचार्‍यावर बांबोळी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पेडणे पोलीसांनी दोघा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील भरारी पथक मंगळवारी रात्री पेडणे तालुक्यात दाखल झाले.सदर पथक खाजगी गाडी घेऊन आले होते.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर संशय आल्याने त्यांच्याकडून ओळखपत्र मागितले. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. सदर कर्मचारी चोर असल्याचा संशय अधिक बळावला.यावेळी ग्रामस्थ व त्या अधिकार्‍यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बघता बघता याचे रुपांतर झटापटीत झाले. या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. यातील एक कर्मचारी गोवा बांबोळी येथे उपचार घेत असून दुसऱ्या कर्मचाऱ्याला पुणे येथे पाठवण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पेडणेतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.

जिल्हा स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ह्या प्रकरणात कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याशी यावेळी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एक्साइजचे राज्यातील मोठे अधिकारी पेडणेत येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.

अभिप्राय द्या..