मुंबई /-

देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज संकटाचा धोका केवळ भारत नव्हे तर चीन, युरोप आणि अमेरिका इथंही निर्माण झालं आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी वाढली आहे.दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे. केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.महाराष्ट्रातील 19 वीज निर्मिती करणारे संच बंद पडले आहेत. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही. त्या राज्यांना जाणून-बुजून कोळसा पुरवला जात नाही. नैसर्गिक आपत्ती किंवा पाऊस असल्याचे सांगून कोळसा देण्याचे टाळलं जात आहे. मात्र केंद्राचे ऊर्जामंत्री वीज टंचाई नसल्याचे सांगतात. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अनेकदा केंद्रीय ऊर्जा मंत्री यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिल्लीत भेटून देखील राज्याला मदत केली जात नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात आलेल्या कोळशाच्या टंचाईमुळे 3,330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याने राज्यावर विजेचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक वीज निर्मिती संच यावर एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने वीज तुटवड्याचा गंभीर प्रश्न राज्यात समोर उभा राहिला आहे. तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून वीज खरेदी तसेच जलविद्युत या दोन पर्यायाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मागणी आणि वीजनिर्मिती यात मोठी तफावत असल्याने येणाऱ्या दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात वीज तुटवड्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असं मत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. पारस येथील 250 मेगावॅट, चंद्रपूर आणि भुसावळ येथील 500 मेगावॅट, तर पोस्टल गुजरात पावर अनलिमिटेडचे चार संच बंद आहेत. या चार संचामध्ये 240 मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती. तर अमरावतीतील 810 मेगावॅट वीज निर्मिती करणारे तीन संच बंद झाले आहे.

एक ते दीड दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध:-

महावितरणकडून आलेल्या माहितीनुसार जवळपास तेरा संचामध्ये कोळशाचा तुटवडा आहे. यामध्ये सर्वात जास्त तुटवडा हा चंद्रपूर कोराडी खापेरखेडा परळी, पारस आणि नाशिक येथील वीज संचामध्ये आहे. कोपर्डी येथे 2400 मेगावॅट, चंद्रपूरमध्ये 2920 मेगावॅट, खापरखेडामध्ये 1340 मेगावॅट, परळीमध्ये 750 मेगावॅट, पारसमध्ये 500 मेगावॅट, नाशिकमध्ये 630 मेगावॅट, तर भुसावळमध्ये बाराशे दहा मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते. मात्र सध्याची या सर्व वीज निर्मिती संच याची कोळशाची परिस्थिती पाहिली तर जवळपास एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचासाठा वीज निर्मिती संचाकडे आहे. त्यामुळेच राज्यावर वीजनिर्मितीचा संकट येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page