You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ.१५१ ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी दुर्गामाता मूर्तींचे पूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ.१५१ ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी दुर्गामाता मूर्तींचे पूजन

सिंधुदुर्ग /-

पौराणिक संदर्भानुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्या महिषासुराचा वध करण्यासाठी शक्तीदेवता प्रगट झाली. त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. म्हणूनच त्या देवीला नाव पडलं महिषासुर मर्दिनी आणि त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र. या नवरात्रोत्सवाला जिल्ह्यात आजपासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली.

गणेशोत्सवानंतर सर्वांना चाहूल लागते ती चैतन्यमय अशा नवरात्रोत्सवाची! आदीशक्तीचं आपल्या घरी आगमन होतं आणि त्यानंतरचे नऊ दिवस अगदी उत्साहात आणि लगबगीत जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जयघोषात देवीचे आगमन झाले. शास्त्रशुद्ध पद्धतीने तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच प्रत्येक घरांतही घटस्थापना करण्यात आली. जिल्ह्यात १५१ ठिकाणी सार्वजनिक व खाजगी दुर्गामाता मूर्तीचे पुजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दांडिया, गरबा तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा निरुत्साह जाणवत आहे. तरीही कोरोना प्रतिबंधक नियम पाळून मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. आजपासून १६ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यनेमाने पूजा, आरती करत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर टळू दे आणि पुन्हा चांगले दिवस येऊ दे, असं गाऱ्हाणं सर्व भक्तगण देवीसमोर घालत आहेत.

अभिप्राय द्या..