You are currently viewing रस्त्यांची कामे आम्हीच करणार विरोधकानीं काळजी करू नये.;गटनेते संजय कामतेकर यांचा टोला..

रस्त्यांची कामे आम्हीच करणार विरोधकानीं काळजी करू नये.;गटनेते संजय कामतेकर यांचा टोला..

कणकवली /-

पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांची कामे होत नाहीत. असे असतानाही नगरसेवक सुशांत नाईक यांनी मागणी केलेली रस्त्याची दोन कामे ही सुशांत नाईक यांच्या होत असलेल्या कॉम्प्लेक्ससाठी त्यांना पाहिजे आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे सत्ताधारी म्हणून आम्हीच करणार. त्याची विरोधी नगरसेवकांनी काळजी करू नये. असा टोला सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांनी लगावला आहे. मुळात सुशांत नाईक व त्यांच्या सोबत आलेल्या दोन नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांची आजची झालेली भेट ही माझ्या माहितीनुसार सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी दुसऱ्याच्या नावाने घेतलेल्या कणकवली नगरपंचायत च्या कचरा टेंडर साठी होती. सुशांत नाईक यांनी रस्त्याचे निवेदन देताना आपल्या होत असलेल्या कॉम्प्लेक्स पुरत्याच रस्त्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. व आपल्या भेटीचे गुपित उघड होऊ नये म्हणून इतर रस्त्यांची नावे सांगितली. विरोधी नगरसेवकांना जर रस्त्याबद्दल एवढाच कळवळा असेल तर त्यांनी कुडाळ – मालवण मधील जनतेचे कंबरडे मोडणारे खड्डेमय रस्ते त्यांच्या पक्षाच्या आमदार वैभव नाईक यांना अगोदर दुरुस्त करायला सांगावेत. ते रस्ते आमदार वैभव नाईक पावसाळ्यात करू शकले का? त्याचाही अभ्यास सुशांत नाईक व अन्य दोन अज्ञानी नगरसेवकांनी करावा. कुडाळ – मालवण मधील रस्त्यांच्या खड्ड्यांची जबाबदारी आमदार वैभव नाईक यांनी स्वीकारली याचा अर्थ ते तेथे विकासकामे करण्यास कमी पडले हे त्यांनी स्वतःहून कबूल केले. कणकवली नगरपंचायत जवळ पावसाळ्यात रस्ते करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी आपल्या भाऊ असलेल्या आमदारांकडे पावसाळ्यात रस्ते होतात का? ते विचारले असते तर नगरपंचायतवर कदाचित त्यांनी टीकाही केली नसती. तसेच कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली भाजी व फळ विक्रेत्यांना बसवून शहराच्या नियोजनात एक शिस्त यावी याकरिता नगरपंचायत ने प्रयत्न केले. मात्र फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेले ग्रीन नेट काढण्याची मागणी म्हणजे हे नियोजन बिघडवण्याचा व यातून जनतेला त्रास देण्याचा विरोधी नगरसेवकांचा यांचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांनी जागा नेमून देण्यात आली. त्या ठिकाणी ते व्यवस्थित व्यवसाय करत आहेत. मात्र कुठेतरी लोकांना त्रास होईल यादृष्टीने नाईक व पारकर यांची ही सूचना आहे. कणकवली नगरपंचायत सत्ताधारी पक्षाचे काम जनताभिमुख सुरू असल्याने कुठेतरी आरोप करून चर्चेत राहण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांचा हा प्रयत्न आहे. अशी टीका गटनेते संजय कामतेकर यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..