You are currently viewing आचरा भागात बिबट्याची दहशत..

आचरा भागात बिबट्याची दहशत..

आचरा /-

आचरा परीसरात वन्य प्राण्यांचा त्रास वाढला असून डुकरांकडून भूईमुग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच
बिबट्याचाही पुन्हा
स्वैराचार वाढला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गणपती मंदिरानजिक रस्त्यावर आचरा पारवाडी ग्रामस्थांना बिबट्या नजरेस पडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वनविभाग कर्मचाऱ्यांनी भेट बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.मात्र तो असफल राहिला.

आचरा भागात मागील काही कालावधी पासून बिबट्याचा वावर वाढला आहे.शुक्रवारी रात्री आचरा पारवाडी येथील व्यावसायिक बंडू परब,राजू परब, अवी परब,मुकेश पुजारे आदींना दुकान बंद करून घरी जाताना गणपती मंदिरानजिक रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याची खबर मिळताच मालवण परीमंडलाचे वन अधिकारी श्रीकृष्ण परीट,वनरक्षक शरद कांबळे, अनिल परब यांनी ग्रामस्थ पर्शुराम शेटये,राजू परब,कौस्तुभ केळकर, प्रदिप केळकर, नरेश परब, मकरंद परब,अर्जुन बापर्डेकर,समिर ठाकूर, केदार शिर्के, विकास गुरव आदींसह अन्य ग्रामस्थांनी यावेळी बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जंगल भागात दडून बसलेला बिबट्या ग्रामस्थ घरी गेल्यावर काही वेळातच पुन्हा पारवाडीतील एका ग्रामस्थाच्या नजरेस पडल्याने निघालेल्या वनविभाग कर्मचाऱ्यांना पुन्हा माघारी बोलवत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या नजरेस पडलाच नाही .वारंवार पारवाडी भागात बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडत असल्याने मोटरसायकल स्वार,पदप्रवाशी या भागातून जायला घाबरत आहेत. काहीं तर या भागातून जाताना ओरड मारत आवाज करत जात आहेत. यामुळे सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पारवाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वन्य प्राण्यांकडून नुकसान ग्रस्त शेतीची वनविभाग कर्मचाऱ्यांकडून पहाणी
आचरा सडा या भागात डूकर,वन्य प्राण्यांकडून भूईमुग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाचे परीट,कांबळे, परब यांनी ग्रामस्थांसमवेत भेट देऊन पहाणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा