You are currently viewing सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेला मनोहर गावडे अखेर शनिवारी पहाटे घरी परतला.;पोलिसांनी घेतले ताब्यात..

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेला मनोहर गावडे अखेर शनिवारी पहाटे घरी परतला.;पोलिसांनी घेतले ताब्यात..

सावंतवाडी /-

ओटवणे येथील तेरेखोल नदीलगत आपली इवॉन कार उभी करुन त्यात आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेला सावंतवाडी शहरातील एका खाजगी बँकेचा अधिकारी मनोहर गावडे हा शनिवारी पहाटे सुखरुप घरी परतला. याबाबतची खबर मनोहर याच्या भावाने फोन करुन सावंतवाडी पोलिसांना दिल्याची माहिती तपासी अधिकारी तौसिफ सय्यद यांनी दिली. त्यामुळे त्याने आत्महत्या केली नसून तो बेपत्ता असल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला आहे. मात्र, त्याच्या बेपत्ता नाट्याचे गूढ पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

मूळ चौकुळ येथील रहिवासी व सद्यस्थितीत कारिवडे येथे वास्तव्यास असलेला मनोहर गावडे 18 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर रविवार 19 सप्टेंबर रोजी त्याची कार व सुसाईड नोट पोलिसांना आढळून आली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र ओटवणे नदीपात्रात शोधमोहीम राबविल्यानंतरही त्याचा मृतदेह आढळून आला नव्हता. त्यामुळे तो जिवंत असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त क रुन त्यादृष्टीने तपास सुरु ठेवला होता. अखेरीस शनिवारी पहाटे मनोहर सुखरुप घरी परतला. हा आत्महत्येचा बनाव त्याने कशासाठी केला याचा उलगडा पोलीस तपासाअंती होणार आहे.पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस मनोहर गावडे याच्या घरी पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी या बँक कर्मचाऱ्याला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा