सिंधुदुर्गनगरी /-
कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. यामध्ये मुख्यतः फिजिशियन्स व ॲनेस्थेशिया स्पेशालिस्ट यांचा समावेश आहे.
तसेच गृह अलगिकरणातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी पथकांची म्हणजेच रॅपिड ॲक्शन टीमची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर व कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. हे पथक रुग्णांची घरी जाऊन नियमित तपासणी करणार आहे. या गृह अलगीकरणातील रुग्णांना आरोग्य यंत्रणेमार्फत एक मेडिकल कीटही पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील गृह अलगिकरणातील रुग्णांसाठी जिल्हा परिषद येथे टेलीमेडिसीनची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी टेलीमेडिसीन सोबतच समुपदेशनाची म्हणजेच कौन्सिलिंगची सोयही उपलब्ध असणार आहे. जिल्हा क्रीडा संकूल ओरोस येथे लवकरच 100 खाटांची सुविधा उभारण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
सध्याच्या या कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील वाढत असणारा कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आपल्या सेवा द्याव्यात व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.