सिंधुदुर्ग /-

जिल्हा कोविड रुग्णालयात नर्स सह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे येथील वाढत्या रुग्णांना व्यवस्थितपणे आरोग्य सुविधा देण्यात मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे कोविडच्या काळात आरोग्य सेवा देण्यासाठी तात्पुरत्या नेमणुका दिल्या जाणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्याना शासनाने आरोग्य खात्यात कायमचे सामाऊन घ्यावे असे आश्वस्त करूनच नेमणुका द्याव्यात अशी मागणी आपण मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे करणार आहे. किंबहुना या लोकांना कायमस्वरूपी नेमणुका मिळत नाहीत तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असे भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सांगितले. तर पालकमंत्री उदय सामंत यांना उघडा डोळे बघा नीट असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ओरोस येथील जिल्हा कोविड रुग्णालयातील कोविड रुग्णांच्या सोई आणि त्यांना दिली जाणारी आरोग्य सुविधा व रुगानाल्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रमोद जठार यांनी आज कोविड रुग्णालयाला भेट दिली. अंगावर पीपीई कीट चढवत प्रमोद जठार थेट कोविडच्या रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या कक्षात दाखल झाले. यावेळी त्यांनी कोविडच्या रुग्णांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत बंड्या मांजरेकर यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकारीही उपस्थित होते.

जिल्हा कोविड रुग्णालयात जिथे १३७ स्टाफ नर्सची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केवळ २९ नर्स कार्यरत आहेत. आयसीयू कक्षात १२ रुग्णांच्या मागे ६ नर्स पाहिजेत तिथे केवळ १ नर्स काम पाहते. आयुषच्या २६ डॉक्टरची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केवळ ७ डॉक्टर कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची कमतरता, मेडीकल ऑफिसरच्या जागा रिक्त असणे अशा अनेक समस्या यावेळी प्रमोद जठार यांच्यासमोर आल्या. याचे कारण त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्याकडून जाणून घेतले असता, या अस्थाई स्वरूपाच्या केवळ तीन महिन्यांकरता नेमणुका असल्याने नियुक्त्या देऊनही कोणी हजार व्हायला पाहत नाही अशी बाब समोर आली. यावेळी प्रमोद जठार यांनी आपण या लोकांना आरोग्य सेवेत कायम करण्यात यावे असा प्रस्थाव आरोग्य खात्याला पाठवा असे जिल्हा शल्य चिकित्सक यांना सुचविले. तसेच आपणही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी करून पाठपुरावाही करतो असे सांगितले. रुगानांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना तात्काळ जेवणासोबत बिसलरी पाण्याच्या दोन बॉटल देण्यात याव्यात अशी मागणी केली. तर रुगानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जेवणातून संत्री, मोसंबी अशी फळे देण्यात यावीत असीही मागणी केली.

पालकमंत्री अजूनही वेळ गेलेली नाही. उघडा डोळे बघा निट

जिल्हा रुग्णालयातील आजच्या परिस्थितीला नेमका जबाबदार कोण या पेक्षा लॉकडाऊन काळात सगळ्या गोष्टींची योग्य काळजी घेतली असती, मुंबई तून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या पाहता हजारापार रुग्णसंख्या जाणार आहे हे डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा रुग्णालयात अद्ययावत पणा आणला असता तर सर्वाना सुखकारक असा हा कोरोनाचा काळ गेला असता. शिवाय रोग्यालाही वाटल असत आपण ओरोसला गेलो म्हणजे बर होऊनच मागे येऊ. मात्र इथली अवस्था पाहता आपण ओरोसला गेलो तर मागे येणार नाही असा जे रोगी आणि त्यांचे नातेवाईक म्हणताहेत हा ठप्पाहीबसला नसता. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. पालकमंत्र्यांना मी एकच सांगेन उघडा डोळे बघा निट आणि याठीकांचा नर्सचा स्टाफ चार पट करा, आणि याच गोष्टीचा आग्रह माझा सरकारकडे राहणार आहे. असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सामाजिक संस्थाना प्रमोद जठार यांचे आवाहन

जिल्ह्यतील नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी येथील रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यसाठी सामाजिक भावनेतून संत्री, मोसंबी अशी फळे, काढे, वाफेची भांडीआणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची मदत करावी. असे आवाहन प्रमोद जठार यांनी यावेळी केले. आता सरकारची वाट न पाहता आपणच आपल्या लोकांची काळजी घ्यायची आहे. तेव्हा मीही अशी मदत करणार आहे. असेहि जठार यांनी सांगितले. तसेच राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण हि मदत करणार असल्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले असल्याचे ते म्हणाले. अशी मदत ज्यांना करायची आहे त्यांनी बंड्या मांजरेकर ९४२२३६७०७१ यांच्याशी संपर्क साधावा. हि मदत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहोचवली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रुगानानी मांडल्या आपल्या तक्रारी

यावेळी कोविड रुगणालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आपल्या विविध समस्या प्रमोद जठार यांच्यासमोर मांडल्या. येथील डॉक्टर आणि कर्मचारी आपल्याला चांगली सेवा देतात मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हि सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. याकडे आपण लक्ष वेध अशी विनंती अनेक रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रमोद जठार यांना केली. यावेळी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत आपण आपल्या मागणीचा नक्की पाठपुरावा करू असे प्रमोद जठार यांनी त्यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page