तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..

तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..

आचरा /-

तळाशीलवाडी ग्रामस्थ कालावल खाडीतील तोंडवळी तळाशील भागातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले होते.  सोमवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार अजय पाटणे उपोषणस्थळी आले. रेवंडीसमोरील कालावल खाडीत वाळू उपशाबाबत ग्रामस्थांची जी मागणी आहे, त्यास अनुसरून कार्यवाही करण्याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयास सविस्तर अहवाल पाठवणार असल्याचे पत्र तहसीलदारांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र  मागणी केलेल्या बंधाऱ्याचे काम शुक्रवारी सुरू न झाल्यास पुन्हा उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे

दुसऱ्या दिवशी आमदार नाईक व माजी खासदार निलेश राणे यांनी बंधाऱ्याबाबत आश्वस्त केल्यानंतर आपली दुसरी मागणी घेऊन ग्रामस्थ उपोषणावर ठाम होते सायंकाळी तहसीलदार पाटणे दाखल झाल्यानंतर सागरी रेवंडीसमोरील कालावल खाडीतील बालू उपशामुळे तळाशीलचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तळाशील रेवंडी समोरील कालावल खाडीतील वाळू उपसा थांबवावा, या  मागणीसाठी तळाशील गाव एकवटला असल्याचे ग्रामस्थांनी त्याना सांगितले.  ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर वाळू उपशाबाबत जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयास सविस्तर अहवाल पाठवतो व तसे आपणास लेखी आश्वासन देतो असे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

मालवण तहसीलदार यांनी ग्रामस्थांना लेखी पत्र देत आश्वस्थ केले त्यात म्हटले आहे की आज रोजी सक्षम झालेल्या चर्चेनुसार तालुका आपली व्यवस्थापन अधिकारी म्हणून मच्छिमारी व्यवरताय, खाडीचे रुंदीकरण, वाळू व्यवसायामुळे होणारे मच्छिमारांचे नुकसान याबाबत सविस्तर अहवाल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व मा. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या 17 ऑगस्ट रोजी सादर करून त्याची प्रत आपणास पाठविण्यात येईल. तरी चालू उपोषण स्थगित करावे. या तहसीलदार यांच्या पत्रानंतर ग्रामस्थांनी चर्चा करून उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार यांनी दिलेल्या शब्दप्रमाणे शुक्रवारी बंधाऱ्याचे काम चालू न झाल्यास तळाशील ग्रामस्थ पुन्हा उपोषणास बसणार असल्याचा इशारा देत उपोषण स्थगित करत असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..